पुढारी ऑनलाईन :
बुलंदशहरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये तीन महिलांसह ६ जणांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये घर जमीनदोस्त झाले.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये शटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या रियाजुद्दीन यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या अपघातात तीन महिलांसह ६ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारे हटवण्याचे काम सुरू आहे. ही घटना सिकंदराबादच्या गुलावठी रोड येथील आशापुरी कॉलनीत घडली.
बुलंदशहरचे डीएम चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, आशापुरी कॉलनीतील एका घरात रात्री 8.30-9 च्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. घरात 18 ते 19 लोक राहत होते, येथून 8 लोकांना बाहेर काढण्यात आले, ज्यांची प्रकृती गंभीर होती. अग्निशमन दल, पोलीस विभागाचे पथक, महापालिकेचे पथक, वैद्यकीय पथक, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.