लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहिल लोचब याच्यासोबत दिल्ली पोलिसांकडे गेले  Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Protest: FIR होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही; छर्रे लागलेल्या साहिलला घेऊन राहुल गांधीचे धरणे

जंतरमंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान साहिल लोचब याच्यावर पोलिसांच्या कारवाईदरम्यान पेलेट गनमधून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Jantar Mantar Sahil Lochab Pellet Gun Firing

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईत पेलेट गनच्या गोळीबारात जखमी झालेल्या १९ वर्षीय आंदोलक साहिल लोचब याच्या तक्रारीवरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे साहिल लोचब याच्यासोबत दिल्ली पोलिसांकडे पोहोचले असून, त्याच्या तक्रारीवर केस ऑफिसर नियुक्त करण्याबरोबरच I/O क्रमांक आणि तक्रारीची अधिकृत पोहोच देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यादेखील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

साहिल लोचब याच्यावर पोलिसांच्या कारवाईदरम्यान पेलेट गनमधून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत त्याच्या डोळ्यांना आणि पोटाला पेलेटच्या गोळ्यांमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

१४ ऑगस्टला लेखी तक्रार

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, साहिल लोचब १४ ऑगस्ट रोजी आपल्या वकिलांसह दिल्ली पोलिसांकडे गेला होता. त्याने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करून घटनेप्रकरणी एफआयआर नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी तक्रारीचा I/O क्रमांक देण्यास नकार दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून त्यावर कोणती कारवाई झाली, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तक्रार दाखल केल्याची अधिकृत पोहोचही देण्यात आली नसल्याचा पक्षाचा दावा आहे.

ई-मेल आणि फोनद्वारेही पाठपुरावा

यानंतर १७ ऑगस्ट रोजी साहिलच्या तक्रारीचा ई-मेल आणि फोनद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही तक्रारीचा I/O क्रमांक किंवा तक्रार स्वीकारल्याची अधिकृत पोहोच देण्यात आली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर साहिल लोचब याने न्याय मिळण्यासाठी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत राहुल गांधीही पोलिसांकडे पोहोचल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आधी मंदिर मार्ग, त्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाणे

राहुल गांधी आणि साहिल लोचब यांनी सुरुवातीला मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. मात्र, तेथे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर दोघे संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी पोलीस उपायुक्तांची (डीसीपी) भेट घेतली.

“साहिलला एफआयआर दाखल करायचा आहे; मात्र त्याला तशी परवानगी दिली जात नाही. दिल्ली पोलीस नाही, तर मग कोण? आम्ही केवळ कुटुंबाला न्याय मिळावा, एवढीच मागणी करत आहोत,” असे राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले.

पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेसचे धरणे

दरम्यान, राहुल गांधी आणि साहिल लोचब पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने दिल्ली पोलिसांनी परिसरात बॅरिकेड्स लावले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यादेखील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचल्या. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

‘न्यायासाठी केवळ तक्रार नोंदविण्याची मागणी’

साहिल लोचबच्या तक्रारीवर एफआयआर नोंदविण्याबरोबरच प्रकरणासाठी केस ऑफिसर नियुक्त करावा आणि तक्रारीचा I/O क्रमांक द्यावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. १४ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दाखल करूनही आणि त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी ई-मेल व फोनद्वारे पाठपुरावा करूनही तक्रारीची अधिकृत नोंद किंवा पोहोच न मिळाल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT