शरद पवार- संजय राऊत file photo
राष्ट्रीय

साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पवार-राऊत एकत्र !

दोन्ही नेत्‍यांनी महाराष्‍ट्राच्या सध्याच्या राजकारणावर भाष्‍य करणे टाळले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला आणि त्यानंतर संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांना सल्ला दिला होता. त्यानंतर प्रथमच शरद पवार आणि संजय राऊत दिल्लीत एकाच मंचावर होते. त्यामुळे दोन्ही नेते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दोन्ही नेत्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेत्यांचा दिल्लीशी संबंध यावर भाष्य केले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पुरस्कारावर भाष्य करणे टाळले आणि त्यामुळेच साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पवार - राऊत एकत्र आले आणि पुरस्कार वादावर पडदा पडला अशी चर्चा सभागृहात होती. दिल्ली स्थित जेष्ठ पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत पार पडले. यावेळी संजय राऊत, अनिल देसाई उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यातील आणि देशातील अनेक राजकीय उलथापालथी कशा घडल्या, राजीव गांधींचा फोन आल्यानंतर शरद पवार कसे महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री झाले, असे अनेक राजकीय किस्से सांगितले. यावेळी संकुचित विचार ठेवू नये असे म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे संदेश देण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतिहासात दिल्लीत आजवर मराठी माणसाने केलेल्या प्रतिनिधित्वाबद्दलही शरद पवार भरभरून बोलले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण, नाथ पै, जॉर्ज फर्नांडिस यांसह अनेक नेत्यांबद्दलही भाष्य केले.

जुन्या आठवणींना उजाळा देताना शरद पवार म्हणाले की, संसदेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. देशाच्या राजकारणात जर स्वतःचे स्थान निर्माण करायचे असेल तर दिल्ली हे सुसंवादाचे केंद्र आहे. यावेळी शरद पवारांनी१९६२- ६३ साली दिल्लीत आल्याची एक आठवण सांगितली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी तीन मूर्ती रोडवर एक बैठक होते. बैठकीच्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आल्या. आम्ही त्यांच्याकडे बघत बसलो मात्र प्रश्न विचारायचे धाडसच आम्हाला झाले नाही. आयुष्यातील पहिली पहिली राष्ट्रीय बैठक होती. मात्र प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही, असेही शरद पवारांनी सांगितले.

नवीन संसद लग्नाच्या मोठ्या मंडपा सारखी वाटते- राऊत

याप्रसंगी बोलताना संजय राऊत यांनी जुन्या संसदेचा इतिहास आणि भव्यता मांडली. दरम्यान, संजय राऊत म्हणाले की नवीन संसद भवन एखाद्या मोठ्या लग्नाच्या मंडपाप्रमाणे वाटते. जुन्या संसदेला एक मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गजांनी जुन्या संसद भवनात काम केले आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्याला परतवून जुने संसद भवन अजूनही ताकदीने उभे आहे. संसदेत आजवर अनेक मराठी लोकांनीही उत्तम काम केल्याचेही राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्याबद्दल संजय राऊत काय बोलतील, याची अनेकांना उत्सुकता होती. संजय राऊत यांनी पुरस्काराविषयी भाष्य केले, शरद पवारांचे कौतुक केले. महादजी शिंदे यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे वर्णन केले मात्र त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना दिला, त्याबद्दल पुन्हा बोलणे टाळले. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने चांगल्या लोकांचे एक संमेलन साहित्य संमेलनापूर्वीच दिल्लीत झाले आणि भाषण संपवताना कार्यक्रम छान झाला, असे म्हणत संजय राऊत यांनी पुरस्कार विषयक वाद उकरुन काढणे टाळले. साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेचे प्रमुख संजय नहार यांचा उल्लेख 'आमचे मित्र' असा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संजय नहार यांनीही छोटेखाणी भाषण करत शरद पवार, संजय राऊत यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. महाराष्ट्रातील नेतेमंडळी वाद विवाद असले तरी राज्यासाठी, राज्याच्या कार्यासाठी ताकदीने आणि एकीने उभे राहतात, त्याचा हा पुरावा आहे असे उद्गार काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT