पुढारी ऑनलाईन :
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे त्यांच्या चित्रपटातील नायकाच्या भूमीकेमुळे जसे लोकप्रिय आहेत. तसेच राजकारणातल्या त्यांच्या निर्णयानेही लोकांच्या मनात ते आदराचे स्थान निर्माण करून आहेत. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. नुकतेच त्यांनी अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील पेडापाडू गावातील सर्व लोकांसाठी पादत्राणे पाठवली. यामुळे गावातील लाेकांसाठी ते पुन्हा एकदा हिराे ठरले. पवन कल्याण यांनी गावकऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
पवन कल्याण हे त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी गावातील लोकांना विना चपलांचे अनवाणी पाहिले. तेंव्हा त्यांनी सर्वांना पादत्राणे पाठवून मानुसकीचे दर्शन घडवले. त्यांच्या या कृतीमुळे गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जन सेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील डुंबरीगुडा मंडलमधील पेडापाडू गावातील रहिवाशांना पादत्राणे पाठवून वैयक्तिकरित्या सहानुभूती व्यक्त केली. अलिकडेच अराकू आणि डुंबरीगुडा भागातील त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, उपमुख्यमंत्र्यांनी स्थानिक समस्यांबद्दल प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पेडापाडू गावाला भेट दिली होती.