पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद येथे वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. जाळपोळ व हत्येच्या घटना घडल्या. या हिंसाचारात ३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुधारित वक्फ कायदा प. बंगालमध्ये लागू न करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक चिघळले होते. हिंसाचारग्रस्त भागातून अनेक लोकांनी पलायन केले होते. पण आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. घरे सोडून गेलेले लोक परतत आहेत. प. बंगाल पोलिस महासंचालक जावेद शमीम यांनी सांगितले की पोलिसांच्या संरक्षणात अनेक लोक घरांकडे परतत आहेत.
सर्वाधिक संवेदनशील बनलेल्या मुर्शिदाबादमधील अनेक गावांमध्ये लोक अगोदरच परतले आहेत. या भागात अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. असेही शमीम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शनिवारपर्यंत मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला होता. पण रविवारपासून अनेक ठिकाणी शांतता असल्याचे दिसून येत आहे. रविवार व सोमवारी हिंसाचाराची कोणतीही घटना निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे घाबरून पळून गेलेले अनेक नागरिक आपापल्या घरी परतत आहेत.
जावेद शमीम यांनी पुढे सांगितले की या भागात प्रत्यक्ष शांतता प्रस्थापित होत आहे. पण अनेक ठिकाणी लोक अफवा पसरवत आहेत. त्यामुळे काही अंशी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अडथळा होत आहे. गेल्या ३६ तासांत कोणतीही घटना घडलेली नाही. तरीही हिंसेला कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शांतता अबाधित रहावी यासाठी मुर्शिदाबादसह आसपासच्या प्रदेशात अनेक विभागातील इंटरनेट सेवा बंद आहेत. अनेक समाजमाध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी इंटरनेट सेवा पूर्णता बंद केली. पोलिसांनी शांती राखण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत जाळोपळीच्या घटना व हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या २०० हून अधिक समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.