Parliament Monsoon Session 2025 updates
नवी दिल्ली : संसदेत आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केला की, सत्ताधारी भाजपकडून केवळ आपल्या मंत्र्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते, तर विरोधकांचा आवाज दडपला जातो.
"मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. पण मला बोलू दिलं जात नाही. संरक्षणमंत्र्यांना संधी दिली जाते, पण आम्हाला नाही," असं राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. "पंतप्रधान मोदी तर एका सेकंदात सभागृहातून बाहेर पडतात. ही नवी पद्धत आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
पहिल्या दिवशीच लोकसभा व राज्यसभेत विरोधकांनी घोषणाबाजी करत पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चेसाठी वेळ दिला जाईल, असं आश्वासन दिलं. मात्र त्याआधीच विरोधकांचा आक्रोश आणि सरकारकडून दुर्लक्ष यामुळे वातावरण तापलं.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. पण घोषणाबाजीच्या गोंधळात त्यांचे वक्तव्य ऐकलेही गेले नाही, अशी परिस्थिती होती.
राहुल गांधींचा रोखठोक सवाल
राहुल गांधी म्हणाले, “कायद्यानुसार, सरकारकडील मंत्र्यांना जसे बोलू दिलं जातं, तसंच विरोधकांनाही बोलण्याचा अधिकार आहे. पण आता हे नवं चित्र आहे – सरकार फक्त तुम्हालाच बोलू देतं.”
भाजप खासदार रवि किशन यांनी विरोधकांवर टीका करत सांगितलं की, “संसदेचा पहिलाच दिवस असूनही विरोधक केवळ राजकारण करत आहेत. विकासावर बोलायला काही नाही, म्हणून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा मागतात. यातून त्यांच्या राजकारणातील पोकळपणा उघड होतो.”