नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत सरकारने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर संसदेमध्ये 'संविधान बदलण्याची गरज का आहे' यावर चर्चा झाली असती, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
सध्याचे सरकार भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वांच्या विरोधात काम करत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, न्यायव्यवस्था, संसद, भारतीय निवडणूक आयोग आणि राजभवन हे संविधानाचे रक्षक असले पाहिजेत. सत्ताधारी सरकार देशाच्या हिताचे नाही, असे ते म्हणाले.
ज्या देशात न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली काम करत आहेत, त्या देशात संविधान धोक्यात आहे, असा आरोप त्यांनी केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात 'संविधानावर' चर्चा होत आहे. त्यानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.