Pappu Yadav Attack | खासदार पप्पू यादव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न : पत्रकार परिषदेत चप्पलफेक, चाकू आणल्याचा आरोप 
राष्ट्रीय

Pappu Yadav Attack | खासदार पप्पू यादव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न : पत्रकार परिषदेत चप्पलफेक, चाकू आणल्याचा आरोप

घटनेनंतर उपस्थित समर्थकांनी संबंधित व्यक्तीला पकडून मारहाण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ उडाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच एका व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल फेकली. हल्लेखोराने चाकू घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पप्पू यादव यांनी केला. या घटनेनंतर उपस्थित समर्थकांनी संबंधित व्यक्तीला पकडून मारहाण केली आणि नंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मात्र आरोपीकडून चाकू जप्त केल्याचे सांगितले असून तो हल्ल्यासाठी आणला होता का, याचा तपास सुरू आहे.

राम मंदिरातील देणगी घोटाळ्याबाबत दाखल झालेल्या एफआयआरच्या पार्श्वभूमीवर पप्पू यादव आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते. याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर धक्काबुक्की झाली आणि त्या व्यक्तीने पप्पू यादव यांच्या दिशेने चप्पल फेकली. परिस्थिती चिघळताच पप्पू यादव यांनी स्वतः त्या व्यक्तीला पकडून ठेवले, तर त्यांच्या समर्थकांनी त्याला बेदम मारहाण केली. घटनेनंतर पप्पू यादव यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला. "राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर मी आवाज उठवल्यापासून माझ्याविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. मला जिवंत जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र मी घाबरणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

पप्पू यादव यांच्या वकिलांनी या घटनेसाठी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. मागील दोन दिवसांपासून खासदारांच्या सुरक्षेबाबत वारंवार तक्रारी करूनही पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली नाही. पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात मोजकेच पोलिस कर्मचारी तैनात होते.

त्यामुळे ही सुरक्षा यंत्रणेची गंभीर चूक असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख सुमित अशी असून तो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे. संतांचा अपमान झाल्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात देताना त्याच्याकडील एक चाकूही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. हा चाकू हल्ल्याच्या उद्देशाने आणला होता का, याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पप्पू यादव यांनी राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारावर आधारित एक नाट्यप्रयोग सादर केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात वाराणसीत गुन्हा दाखल झाला असून विविध हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. पत्रकार परिषदेतील या गोंधळानंतर पप्पू यादव यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT