जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये विशेषत: जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना, पाकिस्तान लष्कराचे 600 एसएसजी कमांडो राज्यात घुसलेले आहेत, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी पोलिस महासंचालक शेषपाल वैद यांनी केला आहे.
हे दहशतवादी हल्ले नाहीत; थेट युद्ध आहे, तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे : वैद
पाक लष्कराचा लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम आहे म्होरक्या
आणखी काही पाक लष्करातील घटक तसेच पाक लष्कर प्रशिक्षित दहशतवादी घुसखोरीच्या योजना आखत आहेत. घुसखोरीचे प्रयत्न करत आहेत, असा दावाही त्यांनी केला. एका स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना वैद म्हणाले, या सर्व घुसखोर 600 वर एसएसजी कमांडोंची ओळखही पटलेली आहे. पाक लष्कराच्या या कृतीमागील हेतू भारतीय सैन्याच्या 15 व्या आणि 16 व्या कॉर्प्सला हानी पोहोचविणे, हाच आहे. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आटोक्यात येत असल्याने पाकच्या गोटात कमालीचे नैराश्य पसरलेले आहे. खोर्यातील शांतता पाकला अजिबात नको आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या एसएसजी कमांडोंचे जीओसी आदिल रहमानी हे जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना मार्गदर्शन करत आहेत. पाकिस्तानी लष्कराचा लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम याने खोर्यातील सर्व स्लीपर सेल सक्रिय केले आहेत, असेही वैद यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराच्या दोन बटालियन जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी सज्ज आहेत. एकीकडे भारतीय लष्कराला व्यग्र करून, दुसरीकडून घुसखोरीची संधी साधायची, असा त्यांचा होरा आहे.
भारतीय लष्कराला टार्गेट करून हल्ले होत आहेत. हे फक्त दहशतवादी हल्ले नाहीत, हे थेट युद्ध आहे. भारताने त्यानुसारच प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असेही वैद म्हणाले.
भारत-पाकिस्तानमध्ये सध्या जे काही सुरू आहे, त्यासह जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्करावर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांकडून सातत्याने सुरू असलेले हल्ले पाहता, भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठल्याही क्षणी कारगिलप्रमाणे युद्ध सुरू होऊ शकते. पाकिस्तानमधून भारतीय भूभागात सुरू असलेली घुसखोरी हे या युद्धाचेच स्पष्ट संकेत आहेत, असा इशारा पाकव्याप्त काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते, लेखक तसेच मानवाधिकारवादी डॉ. अमजद अय्युब मिर्झा यांनी दिला आहे.