जम्मू ः वृत्तसंस्था
पाकिस्तानने गोळीबार केल्यास यापुढे आम्ही तोफहल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. नौसेरा येथील सभेत शहा यांनी सीपलीकडील कुरापतींचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानने गोळीबार केल्यास आम्ही त्यांच्यावर तोफा डागू. पाकिस्तानच्या भ्याड गोळ्यांची आम्हाला भीती वाटत नाही. पाकच्या छुप्या हल्ल्यांसाठी नौसेरा सीमा भागात बंकर्स बनविण्यात आले आहे. मात्र, यापुढे पाकच्या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अशा बंकर्सचीही गरज वाटणार नाही. कारण आम्ही यापुढे बंदुकीऐवजी तोफांनीच प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दहशतवाद्यांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकसोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे शहा यांनी नमूद केले. पाताळात लपले तरी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा शहा यांनी यावेळी दिला.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीवर बोलताना शहा म्हणाले की, ही आघाडी पाकचा अजेंडा राबवू पाहात आहे. या आघाडीचा पहाडी, गुज्जर, वाल्किमी, ओबीसी आदींच्या आरक्षणास विरोध आहे. अमेरिका दौर्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतात आरक्षणाची गरज नसल्याचे विधान केले. आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांनी प्रगती केली आहे. त्यामुळे ते क्रिमिलेअरमध्ये आले आहेत, असे राहुल यांनी अमेरिकेत सांगून आरक्षणविरोधी भूमिका घेतल्याचे शहा यांनी यावेळी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार कुणाचेही आरक्षण हिरावून घेणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी यावेळी दिली.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून दहशतवाद्यांची पाठराखण केली जात आहे. ‘मोहब्बत की दुकान’मधून ते दहशतवाद्यांचा सौदा करीत आहेत. निवडणुका झाल्यानंतर त्यांचे दुकान जमीनदोस्त करणार असल्याचा इशारा शहा यांनी दिला.