नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असतानाच आता बिल्डिंग मटेरियल, साखर, खानपानाच्या अनेक वस्तूंची पाकिस्तानात होणारी निर्यात आणि तिकडून होणारी ड्रायफ्रूटची आयात येत्या 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना कॅटने घेतला आहे. या विषयीची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी मंगळवारी दिली.
सुमारे 1 लाख कोटींची निर्यात थांबवत पाकिस्तानचे आर्थिक आणि व्यावसायिक कंबरडे मोडण्याचा निर्णय आम्ही एक सैनिक म्हणून घेतल्याचे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण भरतीया यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
ओडिशा जिल्ह्यात भुवनेश्वर येथे 25 ते 26 एप्रिलला बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तान सोबत कुठलाही व्यवहार करायचा नाही, असा निर्णय कंफड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व्यापारी संघटनेने घेतला. 250 मोठे व्यापारी आणि 40 हजार व्यापारी संघटन म्हणजे 8 ते 9 कोटी व्यापारी या संघटनेशी संलग्न आहेत. यामुळे 1 लाख कोटींचे किमान व्यवहार ठप्प होणार आहेत. तिकडे अगोदरच महागाई वाढली असल्याने खान्यापिण्याच्या वस्तू मिळणार नाहीत. फक्त ड्रायफू्रट पाकिस्तानमधून आयात होते. त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही, असा दावा भरतीया यांनी केला.
1 मेपासून हा निर्णय अंमलात येणार आहे. या संदर्भात लवकरच आम्ही केंद्र सरकारला कळविणार असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानला साखर, सिमेंट, लोखंड, बिल्डिंग मटेरियल, खान- पान, खेळणे यांसह अनेक वस्तू पाठवल्या जातात. आता हे सगळे पाठवणे बंद केले जाणार आहे. एकीकडे पाणी थांबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता व्यापारी संघटनांच्या या निर्णयाने खाण्याचे साहित्य न पुरवता पाकची नाकाबंदी करण्याचा, कंबर मोडण्याचा निर्णय घेण्यात आला, असेच म्हणता येईल.