नवी दिल्ली : भारताच्या आक्रमक लष्करी पवित्र्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे कणखर वक्तव्य आणि तिन्ही सैन्य दलांचा त्रिशूल 2025 हा संयुक्त युद्धाभ्यास यांमुळे शेजारी राष्ट्र पाकिस्तान पूर्णपणे हादरले आहे. भारताच्या या तयारीमुळे बेचैन झालेल्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या आक्रमकतेला आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी दिली आहे. हा सराव 30 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून तो 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारताच्या या व्यापक सरावामुळे पाकिस्तानने आपली सतर्कता अचानक वाढवली आहे.
गेल्या आठवड्यात राजस्थानच्या जैसलमेर येथे सैनिकांशी संवाद साधताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, ते फक्त थांबले आहे. पाकिस्तानने कोणतेही दुःसाहस केले, तर त्याला पूर्वीपेक्षाही अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. भविष्यात भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्यापूर्वी पाकिस्तानला दोनदा विचार करावा लागेल.
काय आहे त्रिशूल युद्धाभ्यास?
त्रिशूल हा पाकिस्तानच्या सीमेवर सुरू झालेला भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा (भूदल, नौदल आणि हवाई दल) एक संयुक्त युद्धाभ्यास आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच भारत अशा मोठ्या स्तरावर युद्धाच्या सर्व संभाव्य क्षेत्रांमध्ये आपल्या लढाऊ कौशल्याची चाचणी घेत आहे. भारताच्या या आक्रमक तयारीने पाकिस्तानची झोप उडाली आहे. केवळ पाच दिवसांच्या अंतराने पाकिस्तानने दुसरी नोटीस जारी केली आहे, जो त्यांची भीती स्पष्टपणे दर्शवतो.