नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्याच्या ऐवजी दहशतवाद्यांचे खरे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हेच होते. मात्र, बंदोबस्तामुळे त्यांना हा हल्ला करता आला नाही आणि त्यांनी पर्यटकांना लक्ष्य बनवले, अशी माहिती एनआयएच्या तपासात उघड होत आहे.
पर्यटकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची गुप्तचरांकडून माहिती सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना पहलगाम हत्याकांडाच्या काही दिवस आधीच मिळाली होती. विशेषतः श्रीनगरमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांना लक्ष्य केले जाईल, अशी शक्यता त्यात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे त्या भागात बंदोबस्त वाढवण्यात आला होता, अशी माहिती पुढे येत आहे.
या संभाव्य धोक्यामुळे श्रीनगरमधील ‘डल लेक’ आणि मुगल गार्डनच्या सभोवतालच्या झबारवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली होती. पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी काही दिवस आधीपासूनच काश्मीर खोर्यात तळ ठोकून होते, असे एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
गुप्तचर यंत्रणांकडे हल्ल्याच्या शक्यतेबाबत माहिती होती. त्यांना वाटत होते की, हा हल्ला श्रीनगरच्या उपनगरातील एखाद्या हॉटेलवर होईल, कारण यापूर्वी बहुतांश नागरी हत्याकांड हे दक्षिण काश्मीरमध्ये घडले होते. त्यामुळे दाचीगाम, निशात आणि आसपासच्या भागांमध्ये 10-15 दिवसांपूर्वीपासूनच सर्च ऑपरेशन्स सुरू करण्यात आले होते. मात्र जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका अधिकार्यानुसार ही माहिती अचूक नव्हती आणि ती घटनेनंतरच स्पष्ट झाली. त्यामुळे त्यावर फारसे वाचकांनी अर्थ लावू नये, असेही त्यांचे म्हणणे आहे.
हल्ल्यात चार दहशतवादी सामील होते. त्यापैकी दोन स्थानिक होते. या दोघांची ओळख पाकिस्तानला अटारी सीमेवरून गेलेल्या काश्मिरी नागरिकांच्या प्रवासाच्या नोंदींशी जुळवून निश्चित करण्यात आली. या दोघांनी अधिकृतरीत्या परतल्याची नोंद कुठेही सापडली नाही. त्यामुळे ते कदाचित जम्मूच्या कठुआ भागातून पुन्हा भारतात आले असावेत, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.
या दोघा स्थानिक दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी पर्यटकांमध्ये मिसळून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी पर्यटकांना एका फूड कोर्ट कॉम्प्लेक्सकडे नेले, जिथे उरलेले दोन दहशतवादी, जे पाकिस्तानी असावेत, त्यांनी जवळून गोळीबार केला. या दहशतवाद्यांनी बैसरन भागात 4-5 दिवस वास्तव्य केले होते आणि हे स्थानिक काही लोकांच्या मदतीशिवाय शक्य झाले नसते, असेही अधिकार्यांचे म्हणणे आहे. गुप्तचर यंत्रणांना काही वायरलेस संभाषणाचे संकेत मिळाले होते, पण दहशतवाद्यांकडील संप्रेषण उपकरणे अत्याधुनिक असल्याने त्यांच्या संभाषणांचे तपशील कळू शकले नाहीत.
गुप्त ठिकाणांवरून सापडलेली शस्त्रे, जसे स्नायपर रायफल्स, एम-सीरिज रायफल्स आणि आर्मर पियर्सिंग बुलेटस् पाहता हे शस्त्रसाठे अफगाणिस्तानातील नाटो सैनिकांकडून उरलेले असल्याची शंका आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच सुरू केलेले दुकान हल्ल्याच्या दिवशी दुकान उघडले नव्हते. त्याची अनेक केंद्रीय एजन्सी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याकडून चौकशी केली जात आहे. या व्यक्तीची इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्डस् तपासली जात आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे धागेदोरे सापडू शकतात, असे तपासातील एका सूत्राने सांगितले.
एका पर्यटकाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये ‘अल्लाहू अकबर’ म्हणणार्या झिपलाईन ऑपरेटरची चौकशी करून एनआयएने त्याला निर्दोष ठरवले आहे. तो घाबरल्यामुळे ओरडत होता आणि त्यानंतर त्वरित तेथून निघून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने पोलिसांनाही काहीही सांगितले नाही. संध्याकाळी त्याने आपल्या मित्राला फोन केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तपासकर्ते हेही शोधत आहेत की, 2023 च्या ऑगस्टमध्ये कुलगाममध्ये तिघा लष्करी जवानांची हत्या आणि 2023 च्या मे महिन्यात जम्मूच्या पूंछ जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात एक हवाई दलाचा जवान ठार झाला होता, त्यात हाच दहशतवादी गट सामील होता का, हे पाहिले जात आहे.