Global Terrorism Index | पाकिस्तान जागतिक स्तरावर सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश 
राष्ट्रीय

Global Terrorism Index | पाकिस्तान जागतिक स्तरावर सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश

जागतिक दहशतवाद निर्देशांकात शिक्कामोर्तब; गेल्या वर्षभरात दहशतवादामुळे अकराशेवर मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दहशतवादी आणि दहशतवादी कृत्यांना सातत्याने पाठिंबा देणारा पाकिस्तान बुर्किना फासोला मागे टाकत जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. क्रमांक मिळवला आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात (ग्लोबल टेररिझम इंडेक्स) ही बाब स्पष्ट झाली आहे. याच अहवालात भारतात दहशतवादाशी संबंधित मृत्यू आणि हल्ल्यांत घट दिसून आल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी दहशतवादाशी संबंधित 1,139 मृत्यू आणि 1,045 घटनांची नोंद झाली. तेथे सलग सहाव्या वर्षी अशा घटनांतील मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. 2026 च्या या मूल्यमापनानुसार या बिघडलेल्या परिस्थितीचा संबंध तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे पुनरुत्थान आणि अफगाणिस्तान सीमेवरील वाढत्या अस्थिरतेशी जोडला गेला आहे. अहवालात म्हटले आहे की, 2021 मध्ये तालिबानच्या सत्तेत परतण्यामुळे टीटीपीला त्यांचा भौगोलिक विस्तार आणि कार्यान्वित कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी साधन आणि प्रेरणा मिळाली.

जागतिक स्तरावर मागोवा घेतलेल्या चार सर्वांत घातक दहशतवादी संघटनांपैकी टीटीपी ही एकमेव संघटना होती, जिच्यामुळे होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत 2025 मध्ये वाढ झाली. हिंसाचार प्रामुख्याने खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये केंद्रित होता. पाकिस्तानमधील सर्वाधिक मृत्यू येथेच झाले. ओलिस ठेवण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेस रोखून 442 लोकांना ओलिस ठेवले गेले होते. दरम्यान, भारतात दहशतवादाशी संबंधित मृत्यू कमी झाले आहेत. जागतिक स्तरावरील एकूण मृत्यूंमध्ये भारतातील मृत्यूचे प्रमाण 2 टक्के आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये 43 टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

अफगाण-पाकिस्तान सीमावर्ती भाग केंद्रबिंदू

अफगाणिस्तान - पाकिस्तान सीमावर्ती भाग हा सतत संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. येथे सीमापार अतिरेकी कारवायांमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या तणावाचे रूपांतर थेट संघर्षात झाले. अफगाण भूभागावर टीटीपीच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करत पाकिस्तानने काबूल आणि कंदाहारवर हवाई हल्ले केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT