Pakistan Infiltration | सुरक्षा दलांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुप्समध्ये पाकची घुसखोरी 
राष्ट्रीय

Pakistan Infiltration | सुरक्षा दलांच्या व्हॉटस्‌ॲप ग्रुप्समध्ये पाकची घुसखोरी

लष्कर, निमलष्करी दलाच्या १३ ग्रुपमध्ये हेरगिरी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय लष्कर, केंद्रीय निमलष्करी दल आणि नागरी संरक्षण संघटनांच्या १३ अनधिकृत व्हॉटस्‌ॲप ग्रुप्समध्ये पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेच्या हेरांनी (पीआयओएस) घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या सर्व व्हॉटस्‌ॲप ग्रुप्सचे व्यापक सुरक्षा ऑडिट सुरू करण्यात आले आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला पाकिस्तानी गुप्तहेराने ‘डीआरडीओ’ची शास्त्रज्ञ असल्याचे भासवून एका व्हॉटस्‌ॲप ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि संवेदनशील संरक्षण माहिती मिळवली. 'सोनिया' नावाच्या या गुप्तहेराने 'ऑल इंडिया डिफेन्स सिव्हिलियन म्युच्युअल ट्रान्सफर पोस्टिंग' या ग्रुपमध्ये प्रवेश केला होता. तिने एका नागरी कर्मचाऱ्याशी दीर्घकाळ संवाद साधून त्याला आपल्या जाळ्यात ओढले. संबंधित कर्मचाऱ्याने पैशांच्या मोबदल्यात संरक्षण दलाशी संबंधित गोपनीय माहिती या गुप्तहेराला पुरवल्याचे सूत्रांनी सांगितले.

सखोल तपास, जनजागृती मोहीम

या माध्यमांतून सैन्याची तैनाती, हालचाली, संवेदनशील क्षेत्रे आणि प्रमुख संरक्षण ठिकाणांची माहिती गोळा केली जाण्याची भीती सुरक्षा यंत्रणांना आहे. त्यामुळे सर्व जवान आणि कर्मचाऱ्यांमध्ये सायबर हल्ल्यांबाबत सतर्कता वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बनावट ओळख धारण करून ग्रुप्समध्ये शिरलेले नेमके कोण आहेत, त्यांनी कोणत्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, माहितीची गळती किती काळापासून सुरू होती आणि यामागे कोणते मोठे जाळे कार्यरत आहे, याचा सखोल तपास सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे.

संवेदनशील शासकीय कामांसाठी व्हॉटस्‌ॲप वेब टाळण्याचा सल्ला

नवी दिल्ली : शासकीय आणि संवेदनशील माहितीच्या देवाणघेवाणीसाठी संगणकावरील व्हॉटस्‌ॲप वेबचा वापर टाळण्याचा सल्ला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिला आहे. व्हॉटस्‌ॲप वेबचे लॉग इन सेशन सुरू राहिल्यास त्याचा गैरवापर करून संबंधित व्यक्तीच्या खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवला जाऊ शकतो, असा इशारा केंद्राने दिला आहे. यासंदर्भात विशेष ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने ही सूचना जारी केली आहे. व्हॉटस्‌ॲप वेबच्या संगणकावर सुरू असलेल्या खात्याचा अनधिकृत ताबा मिळवल्यास संबंधित व्यक्तीचे संदेश वाचणे, तिच्या नावाने इतरांना संदेश पाठवणे, संपर्क यादी आणि ग्रुपमधील संभाषणांचा गैरवापर करणे शक्य असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

फिशिंगचा धोका; वेळीच लॉग आऊट करा

शासकीय, संस्थात्मक, आर्थिक, गोपनीय किंवा अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण संगणकावरील व्हॉटस्‌ॲप वेबमधून शक्यतो करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ही सुविधा कायमस्वरूपी लॉग इन ठेवू नये आणि प्रत्येक वापरानंतर स्वतः लॉग आऊट करावे, अशी देखील सूचना देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT