Khawaja Asif file photo
राष्ट्रीय

Pakistan Threat Attack Kolkata: भारताने हल्ला केला, तर आम्ही थेट कोलकात्यावर हल्ला करू!" पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे.

मोहन कारंडे

Pakistan Threat Attack Kolkata

इस्लामाबाद: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. "भारताने कोणतीही लष्करी कारवाई किंवा ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केल्यास, पाकिस्तान प्रत्युत्तर म्हणून थेट कोलकात्यावर हल्ला करेल," असे प्रक्षोभक विधान आसिफ यांनी केले आहे. दरम्यान, भारताच्या सीमेपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याचे नाव घेतल्याने संरक्षण तज्ज्ञांकडून या विधानाचा उपहास केला जात असून, ही केवळ पोकळ धमकी समजली जात आहे.

शनिवारी आपल्या सियालकोट या शहरात पत्रकारांशी संवाद साधताना ख्वाजा आसिफ यांनी भारतावर गंभीर आरोप केले. भारत पाकिस्तानविरुद्ध एखाद्या ऑपरेशनचा कट रचत आहे. भारत काही मृतदेह ठेवून त्यांना दहशतवादी घोषित करेल आणि पाकिस्तानवर हल्ल्याचे निमित्त शोधेल, असे आसिफ म्हणाले. मात्र, या आरोपांची पुष्टी करण्यासाठी त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही.

राजनाथ सिंह यांच्या विधानाचा धसका?

काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारील देशाने कोणतीही चुकीची पावले उचलल्यास भारत 'अभूतपूर्व आणि निर्णायक' प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. राजनाथ सिंह यांच्या याच विधानाने पाकिस्तानचा थरकाप उडाला असून, ख्वाजा आसिफ यांचे विधान म्हणजे त्या इशाऱ्याला दिलेली केविलवाणी प्रतिक्रिया असल्याचे मानले जात आहे.

कोलकात्याचा उल्लेख का?

पाकिस्तानच्या सीमेपासून कोलकाता हे भारताच्या पूर्व टोकाला असलेले शहर अतिशय दूर आहे. तरीही आसिफ यांनी कोलकात्याचे नाव घेणे, हे केवळ आपल्या देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि आपण भारताच्या अंतर्भागापर्यंत पोहोचू शकतो, असे भासवण्यासाठी केलेले स्टंटबाजीचे राजकारण असल्याचे बोलले जाते. भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानची ही धमकी पूर्णपणे वास्तवापासून दूर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT