नवी दिल्ली : पाकिस्तानची कोंडी करणारे पाच निर्णय भारताने घेतल्यानंतर त्यातील भारताचेच तीन निर्णय कॉपी करत दोन नवे निर्णय पाकिस्तानने गुरुवारी घेतले. पाकचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद आणि भारतासोबतचा व्यापरही बंद हे ते दोन निर्णय होत.
वाघा बॉर्डर आणि नागरिकांचा व्हिसा बंद करण्याचा निर्णय जसा भारताने घेतला तसाच तो पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समिती उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
- व्हिसावर पाकिस्तानात आलेल्या भारतीयांना एप्रिलपर्यंत परतण्यास सांगण्यात आले आहे.
- भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. शीख यात्रेकरूंना मात्र यातून सूट देण्यात आली आहे.
इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना 30 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत काम करणार्या सहायक कर्मचार्यांनाही भारतात परतण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय उच्चायुक्तातील एकूण कर्मचार्यांची संख्या 30 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
भारतीय मालकीच्या किंवा चालवल्या जाणार्या विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आले आहे.
भारतासोबतचा सर्वप्रकारचा व्यापार निलंबित करण्यात आला आहे.
यासोबतच, पाकिस्तानने सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताची घोषणा पाकिस्तानने फेटाळली आहे. सिंधूच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क असून, भारताने हा करार रद्द करणे हे जलयुद्ध असून आम्ही ते निकराने लढू असे पाकिस्तानने म्हटले आहे.