नवी दिल्ली : DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या माझ्या पाच सहकाऱ्यांना आणि सशस्त्र दलांतील बांधवांना तसेच हौतात्म्याला प्राप्त झालेल्या नागरिकांना मी अत्यंत श्रद्धेने अभिवादन करतो. या दु:खद प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत असलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांचे बलिदान सदैव लक्षात ठेवले जाईल.
आत्तापर्यंत आम्ही अत्यंत संयम राखला आहे आणि आमच्या कारवाया नेमक्या, मोजक्या आणि संघर्ष भडकावणाऱ्या नव्हत्या. मात्र, भारताचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षेवर कोणताही धोका उद्भवला, तर त्याला ठाम आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल."
आपण दहशतवादी तळांचा संपूर्ण नाश करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना एअर मार्शल ए. के. भारती ठामपणे 'होय' म्हणाले. त्याचे परिणाम संपूर्ण जगासमोर स्पष्टपणे दिसत आहेत. मी इतकंच म्हणू शकतो की आम्ही आमची निवडलेली उद्दिष्टं पूर्णत्वास नेली आहेत आणि आमचे सर्व वैमानिक सुरक्षितपणे परत आले आहेत."
व्हाईस ॲडमिरल ए. एन. प्रमोद म्हणाले, " पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलाचे कॅरियर बॅटल ग्रुप, पृष्ठभागावरील युनिट्स, पाणबुडी आणि हवाई तंत्रज्ञान त्वरित समुद्रात पूर्ण लढाऊ सज्जतेसह तैनात करण्यात आले. आम्ही अरबी समुद्रात दहशतवादी हल्ल्याच्या 96 तासांच्या आत अनेक शस्त्रास्त्रांची चाचणी केली.
आमचे पूर्ण तयारी आणि क्षमता असलेले सैनिक उत्तरेकडील अरबी समुद्रात तैनात होते, , आम्ही समुद्र आणि भूमीवरील काही ठिकाणी हल्ला करण्यासाठी सज्ज होतो, ज्यात कराची देखील समाविष्ट होते.
भारतीय नौदलामुळे पाकिस्तानी नौदल आणि हवाई युनिट्सना बचावात्मक स्थितीत राहण्यास भाग पडले. पाकिस्तानच नौदल मुख्यतः बंदरांमध्ये किंवा किनाऱ्याजवळ होती, आणि आमचा त्यांच्यावर सतत वॉच होता.
भारताने दिलेले प्रत्युत्तर अगदी नेमके, प्रमाणबद्ध आणि जबाबदार आहे. पहिल्या दिवसापासूनच सांगतोय पाकिस्तानच्या कोणत्याही कृतीला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदल समुद्रात तैनात आहे."
किती पाकिस्तानी विमाने पाडली या प्रश्नावर एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, "त्यांच्या विमानांना आमच्या सीमेत प्रवेश करण्यापासून आम्ही रोखले. नक्कीच, आम्ही त्यांची काही विमाने खाली पाडली आहेत. आम्ही त्यांच्या हवाईदलाचे नक्कीच नुकसान केले आहे. "
DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, आज सकाळी आम्ही पाकिस्तानच्या DGMO ला पुन्हा एक 'हॉटलाइन' संदेश पाठवला असून, 10 मे रोजी दोघांमधील सहमतीचे उल्लंघन स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.
तसेच, जर अशा कारवाया पुन्हा झाल्या, तर आम्ही तीव्र आणि निर्णायक कारवाई करू, हा आमचा निश्चयही स्पष्टपणे सांगितला आहे.
पाकिस्तानकडून कुठलेही उल्लंघन झाल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या लष्करप्रमुखांनी आमच्या लष्करी कमांडरला पूर्ण अधिकार दिले आहेत."
पाकिस्तानी लष्कराच्या जीवितहानीबाबत विचारण्यात आले असता, DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "मी याआधीच नियंत्रण रेषेवर ३५ ते ४० जणांच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. कृपया हे लक्षात ठेवा की ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर, पाकिस्तान लष्कराचे प्रत्युत्तर हे भारतीय लष्कर किंवा भारतीय सशस्त्र दलांच्या पायाभूत सुविधांवर केंद्रित होते.
आपली लक्ष्ये मात्र फक्त दहशतवादाशी संबंधित होती. त्यानंतर, जेव्हा त्यांनी आमच्यावर हवाई घुसखोरी आणि आमच्या पायाभूत सुविधांवर हवाई कारवाया सुरू केल्या, तेव्हा आम्ही अधिक प्रभावी आणि जड शस्त्रास्त्रांचा वापर केला. त्यामुळे तिकडेही जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे, परंतु त्याचे मूल्यांकन अजून सुरू आहे."
DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "माझा पाकिस्तानच्या DGMO सोबत काल 3.35 वाजता संपर्क झाला होता आणि त्याचा परिणाम म्हणून 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी सीमा ओलांडून होणारी गोळीबार व हवाई घुसखोरी थांबवण्यावर सहमती झाली.
हेही लक्षात घ्यावे लागेल की, ही चर्चा पाकिस्तानच्या DGMO यांनी शत्रुत्व थांबवण्याचा प्रस्ताव मांडल्यावर झाली होती. या चर्चेच्या पुढील टप्प्यात 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा बोलण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून या सहमतीला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया निश्चित करता येईल.
परंतु, अपेक्षेप्रमाणेच, केवळ काही तासांत पाकिस्तान लष्कराने ही सहमती भंग करत नियंत्रण रेषेवर आणि सीमेजवळून पुन्हा गोळीबार केला आणि मागील रात्रीपासून आज पहाटेपर्यंत ड्रोन घुसखोरी केली. या उल्लंघनांना आम्ही ठाम आणि शक्तिशाली प्रत्युत्तर दिले.
एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, "शत्रूला जिथे सर्वाधिक त्रास होईल अशा ठिकाणी हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार एक जलद, समन्वित आणि नियोजित कारवाई करत आम्ही त्यांच्या हवाई तळांवर, कमांड सेंटर्सवर, लष्करी पायाभूत सुविधांवर आणि हवाई संरक्षण प्रणालींवर संपूर्ण पश्चिम सीमाभागात जोरदार हल्ले केले.
ज्याठिकाणी हल्ले करण्यात आले त्यामध्ये चकलाला, रफिक, रहिम यार खान यांचा समावेश होता. यातून भारत कोणतेही आक्रमण सहन करणार नाही, हा संदेश दिला गेला. यानंतर सर्गोधा, भुलारी आणि जेकबाबादवरही हल्ले करण्यात आले.
आमच्याकडे या सर्व तळांवरील प्रत्येक प्रणालीला लक्ष्य करण्याची आणि अजून पुढे जाण्याचीही पूर्ण क्षमता आहे."
एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, ८ मे रोजी संध्याकाळी सुमारे ८ वाजल्यापासून, पाकिस्तानी मानवरहित हवाई प्रणाली, ड्रोन आणि लढाऊ वाहनांनी भारतीय हवाई दलाच्या अनेक तळांवर हल्ला चढवला. यामध्ये जम्मू, उधमपूर, पठाणकोट, अमृतसर, भटिंडा, डलहौसी, जैसलमेर यांचा समावेश होता.
आमच्या सर्व हवाई संरक्षण तोफा आणि प्रणाली त्यांच्या प्रतीक्षेत सज्ज होत्या. त्यामुळे आमच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण मिळवले. त्यांनी आधुनिक हवाई संरक्षण प्रणालींसह पारंपरिक प्रणाली जसे की पेचोरा आणि IAF सामर (SAMAR) चा वापर करून ही घुसखोरी निष्प्रभ केली.
या पाकिस्तानी हल्ल्यांमुळे जमिनीवर कोणतीही हानी झाली नाही आणि हे एकत्रित हवाई हल्ले पूर्णतः परतवले गेले."
DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, भूमीवरही आम्ही काही महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या, जसे की हवाई संरक्षण यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तंत्रज्ञानाची तैनाती. यामार्फत भारतीय हवाई दलासोबत एक एकत्रित प्रणाली उभी करण्यात आली.
तुमच्यापैकी काहीजणांनी अशा प्रकारच्या रचनेमुळे हवाई घुसखोरी रोखण्यात मिळणाऱ्या फायद्यांवर भरभरून गौरवोद्गार काढले आहेत, हे मी ऐकले आणि पाहिले आहे.
आम्ही भूमी, समुद्र आणि हवाई क्षेत्रातील फौजांची तैनाती केली होती. ९ आणि १० मेच्या रात्री पुन्हा एकदा ड्रोन आणि विमानांच्या स्वरूपात घुसखोरी झाली. या वेळी हवाई तळ आणि अत्यंत महत्त्वाच्या लॉजिस्टिक सुविधांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला.
पण हा प्रयत्न देखील अपयशी ठरला आणि भारतीय हवाई दल व भारतीय लष्कराच्या एकत्रित हवाई संरक्षण व्यवस्थेने अत्यंत शौर्याने आणि कार्यक्षमतेने त्याचा बंदोबस्त केला."
DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, काही हवाई तळांवर आणि दारुगोळ्याच्या साठ्यांवर हवेतून वारंवार हल्ले करण्यात आले. मात्र सर्व हल्ले यशस्वीपणे परतवले गेले.
पाकिस्तानच्या लष्कराने असा अहवाल दिला आहे की, ७ ते १० मे दरम्यान नियंत्रण रेषेवर झालेल्या तोफगोळ्या आणि लघु शस्त्रांच्या गोळीबारात त्यांचे सुमारे ३५ ते ४० सैनिक मृत झाले आहेत."
भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या पत्रकार परिषदेला सुरवात झाली आहे. भारतीय लष्कराचे DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई, संचालक जनरल एअर ऑपरेशन्स (DG Air Ops) एअर मार्शल अवधेश कुमार भारती, संचालक जनरल नेव्हल ऑपरेशन्स (DGNO) वाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, हे ऑपरेशन केवळ दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अनेक तळ उद्धवस्त केले.
त्या नऊ दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, ज्यामध्ये युसुफ अझहर, अब्दुल मालीक रऊफ आणि मुदासिर अहमद यांसारख्या दहशतवाद्यांचा समावेश होता.
हे सर्व IC814 विमान अपहरण प्रकरण आणि पुलवामा स्फोटात सहभागी होते. या कारवायांनंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. दुर्दैवाने त्यांच्या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिक तसेच गुरुद्वाऱ्यांसारख्या धार्मिक स्थळांवर हल्ले झाले, ज्यामध्ये जीवितहानी झाली.
या कारवाईत भारतीय हवाई दलाने मोठी भूमिका बजावली, त्यांनी काही दहशतवादी तळांवर थेट हल्ले केले. भारतीय नौदलाने अचूक क्षेपणास्त्रांच्या (precision munitions) स्वरूपात अत्यंत उपयुक्त पाठबळ दिले. भारतीय हवाई दलाची विमाने त्यावेळी आकाशात सज्ज स्थितीत होती."
एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी हवाई दलाच्या कामगिरीची माहिती दिली. त्यांनी मुरिदके दहशतवादी तळावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा सविस्तर व्हिडिओ दाखवला.
ते म्हणाले की, ८ आणि ९ तारखेच्या रात्री, रात्री १०:३० वाजल्यापासून आमच्या शहरांवर ड्रोन आणि मानवरहित हवाई वाहनांनी मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू झाले. श्रीनगरपासून ते नालिया पर्यंत हल्ले होत होते. पण आम्ही पूर्णतः सज्ज होतो, आणि आमच्या हवाई संरक्षणाच्या तयारीमुळे शत्रूने निशाणा साधलेल्या कोणत्याही ठिकाणी जमिनीवर कोणतीही हानी झाली नाही.
आम्ही नेमके आणि नियोजित प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा एकदा लाहोर आणि गुजरानवालामधील लष्करी तळ तसेच पाळत ठेवणाऱ्या रडार केंद्रांवर लक्ष्य केले.
ड्रोन हल्ले सकाळपर्यंत सुरू होते, पण आम्ही त्यांचा यशस्वी प्रतिकार केला. हे ड्रोन हल्ले लाहोरच्या आसपासच्या भागातून सुरू करण्यात आले होते, आणि त्या वेळी शत्रूने लाहोरवरून त्यांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नागरी विमानांचे उड्डाणही सुरूच ठेवले होते. ही एक अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील कृती होती. त्यामुळे आम्हाला अत्यंत काळजीपूर्वक आणि संयमाने प्रत्युत्तर द्यावे लागले."
ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांना धडा शिकवताना भारतीय सैन्यातील जीवीतहानी टाळली. संभाव्य कारवाईच्या भीतीने अनेक ठिकाणे दहशतवाद्यांनी पूर्वीच सोडली होती.
आम्ही स्वतःसाठी एक नैतिक बंधन घातले होते आम्ही केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य करणार आणि सामान्य नागरिकांची जिवीतहानी टाळणे हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट होते.
नऊ टारगेट्स आमच्या विविध गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यातील काही तळ पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये होते, तर इतर काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होते. मुरिदके जो लष्कर-ए-तोयबाचा मुख्य तळ आहे, येथेच अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारखे कुप्रसिद्ध दहशतवादी घडवले आहेत.
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे सर्वोच्च कमांडर्स आज (रविवार) सायंकाळी साडे सहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरच्या प्रगतीसह भारताच्या नवीन सामरिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेत पुढील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत:
लेफ्टनंट जनरल राजीव घई, संचालक जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO), भारतीय थल सेना
एअर मार्शल अवधेश कुमार भारती, संचालक जनरल एअर ऑपरेशन्स (DG Air Ops), भारतीय हवाई दल
वाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद, संचालक जनरल नेव्हल ऑपरेशन्स (DGNO), भारतीय नौदल
DGMO – ले. जनरल राजीव घई
ऑक्टोबर 2024 पासून DGMO म्हणून कार्यरत असलेले ले. जनरल राजीव घई हे सध्या पाकिस्तानसोबत चालू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत लष्करी कारवायांचे नियोजन व अंमलबजावणी करत आहेत. DGMO म्हणून ते प्रत्यक्ष सीमेवरील कारवायांसह गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधतात आणि संकट काळात पाकिस्तानसोबत हॉटलाइनद्वारे संवाद साधण्याची जबाबदारी सांभाळतात.
DG Air Ops – एअर मार्शल ए. के. भारती
1987 बॅचचे फायटर पायलट एअर मार्शल भारती यांनी हवाई दलातील आक्रमक मोहिमा आणि हवाई हल्ल्यांचे नेतृत्व केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, त्यांनी IAF च्या अचूक हल्ल्यांचे समन्वयन केले असून, देशभरातील महत्त्वाच्या हवाई तळांवर तत्परता राखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
DG Naval Ops – वाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद
15 जानेवारी 2024 पासून DGNO पदावर असलेले वाइस अॅडमिरल प्रमोद हे नौदलातील समन्वय आणि समुद्रात होणाऱ्या सामरिक हालचालींसाठी जबाबदार आहेत. त्यांनी विविध युद्धनौकांची कमान सांभाळली असून, सध्या अरबी समुद्र व हिंद महासागरात नौदलाची उपस्थिती व सामरिक दबाव टिकवून ठेवण्याची भूमिका बजावत आहेत.
भारतातील दहशतवादी कारवायांमधील पाकिस्तानच्या सहभागाचे ताजे पुरावे घेऊन भारताचे एक शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे (UNSC) त जाणार आहे. पुढील आठवड्यात UNSCR 1267 (प्रतिबंध) समितीची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काश्मीरबाबत आमची भूमिका खूपच स्पष्ट आहे. आता केवळ एकच मुद्दा उरलेला आहे, तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर (PoK) परत मिळवणे. याशिवाय इतर कोणत्याही विषयावर पाकबरोबर चर्चा करण्यासारखे काहीही नाही.
जर पाकिस्तान दहशतवाद्यांना आमच्याकडे सुपूर्द करण्याबाबत बोलत असतील, तर आम्ही चर्चा करू शकतो. दुसऱ्या विषयावर चर्चा करण्याचा माझा अजिबात इरादा नाही. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी1 मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना फोन केला होता. त्यावेळी जयशंकर यांनी त्यांना ''आम्ही पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करू आणि यात अजिबात काहीही शंका नाही,'' असे स्पष्ट सांगितले होते. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली गेली आहे.
पाकिस्तानकडून यापुढे बंदुकीची गोळी आल्यास त्याचे प्रत्युत्तर म्हणून आमच्याकडून तोफगोळा डागला जाईल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. याबाबतचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
भारतीय हवाई दलाने ट्विट केले आहे की, "कार्यवाही अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. भारतीय हवाई दल सर्वांना अटकळ आणि असत्यापित माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करते."
पाकिस्तानकडून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबारानंतर मागील काही दिवस पुंछमध्ये तणावची परिस्थिती होती. मात्र रात्री ड्रोन आणि गोळीबाराची कोणतीही घटना घडली नाही. त्यामुळे आज सकाळपासून पुंछमधील परिस्थिती सुरळीत आहे, असे वृत्त ANIने दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजाैरीमध्ये परिस्थिती सामान्य आहे. रात्री ड्रोन, गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा मारा झाल्याचे वृत्त नसल्याचे वृत्त ANIने दिले आहे.
अमृतसरमध्ये हाय अलर्ट, भारत-पाकिस्तान तणावादरम्यान नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
मध्यरात्रीपासून जम्मू शहरात परिस्थिती सामान्य दिसते. सीमेवर मध्यरात्रानीतर ड्रोन हल्ला, गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा मारा झाल्याचे वृत्त नाही .अखनूरमध्ये परिस्थिती सामान्य आहे.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. सलग दोन दिवस भारताने दिलेल्या तडाख्यानंतर पाकिस्तानचे कबंरड मोडलं. शनिवारी (१० मे) भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आपले 'नापाक' हल्ले सुरु ठेवले. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याचे घटना समोर आल्या आहेत. भारतानेही या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जाणून घेवूया Live Updates...