Pakistan airstrike Afghanistan border
नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवार मध्यरात्री अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना या कारवाईत लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. या हवाई हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती दिली की, सैन्याने तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि त्यांच्या संलग्न संघटनांच्या सात तळांवर गुप्त माहितीच्या आधारे 'सिलेक्टिव्ह ऑपरेशन्स' केले आहेत. तसेच, सीमा भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटावरही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानने हे हल्ले नेमक्या कोणत्या ठिकाणी केले, हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, सोशल मीडियावरील वृत्तांनुसार हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाले आहेत. यावर अफगाण सरकारची प्रतिक्रियाही समोर आली आहे. अफगाण सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानने एका मदरशावर हल्ला केला असून यामध्ये १९ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशाराही दिला आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ११ सैनिक आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच, बन्नू जिल्ह्यात झालेल्या एका अन्य हल्ल्यात लेफ्टनंट कर्नलसह दोन सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानमध्ये बसलेल्या टीटीपी नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही संघटना अफगाण तालिबानपेक्षा वेगळी असली तरी त्यांची जवळची सहकारी मानली जाते. टीटीपीचे लढवय्ये अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानवर हल्ले करतात, असा आरोप पाकिस्तान दीर्घकाळापासून करत आहे. मात्र, काबुल आणि टीटीपीने हे आरोप नेहमीच फेटाळले आहेत. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. गेल्या वर्षी सीमाभागात झालेल्या चकमकीत अनेक सैनिक आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. सध्या कतारच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी लागू असली, तरी अद्याप कोणताही औपचारिक करार झालेला नाही.