नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारतीय हवाई दलाच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानच्या हद्दीत ३१४ कि.मी. अंतरावर उडणारे लष्करी विमान पाडले होते. जमिनीवरून हवेत केलेला हा भारतातील सर्वात लांब अंतराचा हल्ला होता, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने ताज्या अहवालात दिली आहे. यावरून केवळ अंतर शत्रूच्या विमानाला भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेपासून वाचवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार, संघर्षाच्या काळात पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र उघडे ठेवत तेथून नागरी विमानांची ये-जा सुरूच ठेवली होती. यामुळे नागरी विमानांना लक्ष्य बनण्याचा धोका होता. मात्र भारताने पाकिस्तानी लष्करी विमान अचूक ओळखून ते पाडले. अहवालात पाडलेल्या विमानाचा उल्लेख 'स्पेशल मिशन एअरक्राफ्ट' असा केला आहे. तथापि, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी हे हवेतील धोका व टार्गेटची एकाचवेळी ओळख पटवणारे एडब्ल्यूएसीएस विमान होते, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. याला हवेतील कमांड सेंटरसुद्धा म्हटले जाते.
टार्गेटस्चे फोटो प्रसिद्ध
संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानी ठिकाणांचे फोटो शेअर केले गेले आहेत.
अशी आहे एस-४०० संरक्षण यंत्रणा
l एस-४०० ट्रायम्फ ही रशियाची प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली. २००७ मध्ये लाँच.
l फायटर जेटस्, बॅलिस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन व स्टेल्थ विमान पाडण्याची क्षमता.
l हवेतील धोक्यांपासून संरक्षणासाठी मजबूत ढालीसारखे काम करते.
l जगातील अत्यंत आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेत गणना.
l भारताकडे एस-४०० च्या ३ ऑपरेशनल स्क्वॉड्रन्स
l एका स्क्वॉड्रनमध्ये २५६ क्षेपणास्त्रे. भारताकडील सध्याची ३ स्क्वॉड्रन्स वेगवेगळ्या सीमांवर तैनात.