नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात काल मंगळवारी २६ निष्पाप लोकांचा जीव घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी, गृहसचिव आणि गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे डीजीपी यांच्यासोबत आपत्कालीन बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही या घटनेचा निषेध नोदंवत सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वीभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तारिक कर्स यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच त्यांनी सध्याच्या परिस्थितीत आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली.
सीमेपलीकडून झालेल्या या भ्याड हल्ल्याला ताकदीने उत्तर दिले पाहिजे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुट राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सरकारने सुरक्षीत वातावरण निश्चित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करायला हवी. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी पाउल उचलावे लागेल असे ते म्हणाले.
याआधी काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी म्हंटले की, सरकारने दहशतवादी बाबत कडक धोरण अवलंबावे. सरकारने दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे उधळून लाउन त्यांना सडेतोड उत्तर द्यावे. यासाठी संपूर्ण ताकदीचा वापर करावा. दशहतवादाशी कोणत्याही प्रकारचा समझोता होणार नाही. ते म्हणाले तीन दिवसांपूर्वीच मी काश्मीरमध्ये होतो असे ते म्हणाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. ते सर्वत्र फिरत होते. निसर्गाचा आनंद लुटत होते. ते पाहून समाधान वाटत होते. आम्हीही रात्रीपर्यंत बाहेरच होतो. मात्र दुसर्या दिवशी असे काही घडेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. काश्मीरमधले वातावरण सर्वसामान्य असल्याचे दिसून येत होते. मात्र अशी दुर्देवी घटना आता समोर आली आहे.