Pahalgam Terror Attack
पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरुद्धात कठोर पाऊले उचलली आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२३) कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (सीसीएस) बैठक झाली. या बैठकीत सिंधू जल वाटप करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पाकिस्तानातील ८० टक्के लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९६० साली झालेला एक महत्त्वाचा जलवाटप करार झाला होता. हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करण्यात आला होता. या करारानुसार भारताला रावी, बियास व सतलज या पूर्वेकडील नद्या वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सिंधू, झेलम, चेनाब या पश्चिमेकडील नद्याचे पाणी वापरण्यास पाकिस्तानला मुभा देण्यात आली. पाकिस्तानची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण येताच तेथील लोकांना पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे.पाकिस्तानची ८० टक्के लागवडीयोग्य जमीन (१६ दशलक्ष हेक्टर) सिंधू नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी होणार आहे.