पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल संरक्षण मंत्रालयाने घेतली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. आज केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीतही या मुद्द्यावर अधिक तपशीलवार चर्चा होण्याची अपेक्षा असल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला. त्यांनी श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षाबाहेर पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली.श्रीनगरमध्ये मृतांच्या कुटुंबीयांना अमित शहा भेटताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी शहा यांच्याकडे, 'आम्हाला न्याय हवा आहे', अशी मागणी केली.त्यापूर्वी, मंगळवारी शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व सुरक्षा एजन्सींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. मंगळवारी संध्याकाळी ते श्रीनगरला पोहोचले. 'हे भ्याड दहशतवादी कृत्य केलेल्यांना सोडले जाणार नाही.' असा इशारा त्यांनी दिला आहे. अमित शहा यांनी या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिली.