पुढारी ऑनलाईन डेस्क : Daripalli Ramaiah Passes Away | तेलंगणा राज्यात एक कोटी झाडं लावणारे 'वृक्षपुरुष' पद्मश्री दरीपल्ली रामैया यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रेड्डीपल्ली या मुळगावी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. रामैया यांना खम्मम जिल्ह्यात ग्रीन वॉरियर, चेट्टू (वृक्ष) रामय्या, वनजीवी म्हणून ओळखले जात होते. गेल्या अनेक दशकात एक कोटी झाडे लावल्याबद्दल रामैया यांना २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रामैया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. निसर्ग आणि पर्यावरणाशिवाय मानवजातीचे अस्तित्व अशक्य आहे. यावर दरीपल्ली रामैया यांचा ठाम विश्वास होता. रामैया यांनी आपले संपूर्ण आयुष्य पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित करून तरुणांना प्रेरणा दिली, असे रेड्डी यांनी सांगितले. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार, बीआरएस अध्यक्ष के चंद्रशेखर राव आणि इतर अनेक नेत्यांनीही रामैया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.