राष्ट्रीय

पापळकर यांच्यासह राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात 'पद्म पुरस्कार-2024' राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आले. एकूण 65 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर तसेच अन्य वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. दुसर्‍या टप्प्यात पार पडलेल्या या पद्म पुरस्कार प्रदान समारंभात दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार तमिळ सुपरस्टार चिरंजीवी आणि अभिनेत्री-नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातून सहा मान्यवरांना विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, डॉ. अश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रात, कुंदन व्यास यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रात, उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा आणि मल्लखांब प्रशिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी 'पद्मश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

SCROLL FOR NEXT