पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉटेल बुकिंग करणाऱ्या ओयो (OYO) कंपनीने आपले नवीन नियम जाहिर केले आहेत. यापुढे अविवाहित जोडप्यांना ओयोमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ओयोने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी लागू केली आहे.
अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ओयोने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या खोल्यांमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने याची सुरुवात मेरठपासून केली आहे. सुधारित धोरणांतर्गत, सर्व जोडप्यांना ऑनलाइन बुकिंग वेळीच त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागणार आहे. ओयोने मेरठमधील आपल्या भागीदार हॉटेलांना याची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनी इतर शहरांमध्येही त्याची अंमलबजावणी करू शकते.