अनिल साक्षी
जम्मू : “जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे” या उक्तीवर 2025 मध्ये काश्मीरमध्ये आलेल्या सुमारे साडेदहा लाख देशी पर्यटकांनी पुन्हा एकदा साजेसा ठसा उमटवला आहे. अपघात, दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेच्या घटना घडूनही काश्मीरने इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित केले, हे विशेष मानले जात आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, 2025 या वर्षात काश्मीरमध्ये 10 लाख 68 हजार 811 पर्यटकांनी भेट दिली, यामध्ये 10.47 लाखांहून अधिक देशी पर्यटक आणि 21 हजार 361 परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. वेळोवेळी आलेल्या अडथळ्यांनंतरही पर्यटन क्षेत्राने समाधानकारक कामगिरी केली असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. पर्यटन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, काही महिन्यांत देशी पर्यटनात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले, तरीही परदेशी पर्यटकांची संख्या तुलनेने स्थिर राहिली, ही बाब काश्मीरच्या सुरक्षिततेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होत असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात पर्यटनावर मोठा परिणाम झाला. त्यानंतर हळूहळू पर्यटन पुन्हा सावरू लागले.
उत्तम पायाभूत सुविधा, लक्षवेधी प्रचार आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद यामुळे भविष्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला. 2025 चे आकडे स्पष्टपणे दाखवतात की, आव्हानांनंतरही काश्मीर देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.
पर्यटन अधिकार्यांच्या मते, वर्षभर परदेशी पर्यटकांची सातत्यपूर्ण उपस्थिती ही काश्मीरची सकारात्मक प्रतिमा आणि स्थैर्याचे मजबूत संकेत आहेत. नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे आणि हिवाळी पर्यटन यामुळे परदेशी पर्यटक काश्मीरकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारचा विशेष प्रचार अभियानाचा विचार
ही गती कायम राखण्यासाठी सरकारकडून लक्ष केंद्रीत पर्यटन प्रचार मोहिमेची योजना आखली जात आहे. देश-विदेशातील प्रमुख विमानतळ, ट्रॅव्हल हब आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शनांमध्ये काश्मीरचा प्रचार केला जाणार आहे. काश्मीरला सुरक्षित, अतिथीशील आणि वर्षभर फिरण्यायोग्य पर्यटनस्थळ म्हणून सादर करण्यावर भर दिला जाणार आहे.