Opposition protest Delhi
नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्तीच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, परिवहन भवन येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडवला. यानंतर संतप्त झालेल्या काही खासदारांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
बिहारमधील मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आणि 'मतचोरी'च्या आरोपांना विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना परिवहन भवनजवळ अडवल्यानंतर अनेक नेते रस्त्यावरच बसले आणि 'SIR प्रक्रिया मागे घ्या', 'मतचोरी थांबवा' अशा घोषणा देऊ लागले.
यावेळी आंदोलक खासदारांनी 'SIR' आणि 'मतचोरी' असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. मोर्चा सुरू करण्यापूर्वी संसद भवनाच्या मकरद्वारावर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. या मोर्चात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, टी.आर. बालू (द्रमुक), संजय राऊत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), डेरेक ओ'ब्रायन (तृणमूल काँग्रेस), अखिलेश यादव (समाजवादी पक्ष) यांच्यासह द्रमुक, राजद आणि डाव्या पक्षांचे अनेक खासदार सहभागी झाले होते.
निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:३० वाजता भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांनी ३० खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यांची नावे आधी कळवण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी आंदोलक खासदारांना सांगितले की, ३० जणांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पायी किंवा वाहनाने जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, विरोधी पक्ष या प्रस्तावासाठी तयार झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोर्चासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संसद मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी थेट पोलीस बॅरिकेड्सवरून उडी मारली. बिहारमधील मतदार यादीतील बदलांविरोधात ते इतर खासदारांसह रस्त्याच्या मधोमध धरणे आंदोलन करत बसले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले, "आम्ही शांततेत निवडणूक आयोगाकडे जात होतो, पण आम्हाला रोखण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे."
या आंदोलनादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, सुष्मिता देव, संजना जाटव, ज्योतिमणी यांनीही बॅरिकेड्सवर चढून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकारामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.