NITI Aayog meeting 2026 PM Modi X
राष्ट्रीय

NITI Aayog meeting 2026: असं पहिल्यांदाच घडलं! PM मोदींच्या बैठकीत अनेक वर्षांचा पायंडा मोडला; दिल्लीत नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या नीती आयोगाच्या ११ व्या नियामक परिषदेच्या बैठकीत एक नवा इतिहास रचला गेला.

मोहन कारंडे

NITI Aayog meeting 2026

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या नीती आयोगाच्या ११ व्या नियामक परिषदेच्या बैठकीत एक नवा इतिहास रचला गेला. गेल्या काही वर्षांपासून विरोधकांच्या बहिष्कारामुळे आणि अनुपस्थितीमुळे चर्चेत राहणाऱ्या या वार्षिक बैठकीला यंदा मात्र देशातील सर्वच्या सर्व २८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. केंद्र आणि राज्यांमध्ये विकासात्मक सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या सर्वोच्च मंचावर बऱ्याच वर्षांनंतर अशी हाऊसफुल्ल उपस्थिती पाहायला मिळाली.

विरोधकांचीही कंबर कसली; 'या' मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे, विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या सर्व ७ राज्यांचे मुख्यमंत्री यात सहभागी झाले होते. यामध्ये तामिळनाडूचे जोसेफ विजय, कर्नाटकचे डी. के. शिवकुमार, केरळचे व्ही. डी. सतीशन, तेलंगणाचे रेवंत रेड्डी, झारखंडचे हेमंत सोरेन, हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंग सुखू आणि जम्मू-काश्मीरचे ओमर अब्दुल्ला यांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजप व एनडीएशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही बैठकीला हजेरी लावली. याशिवाय, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची स्वतंत्र भेट

बैठक संपल्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक आणि स्वतंत्र भेट घेतली. विशेष म्हणजे, यातील चार राज्ये विरोधी पक्षांच्या ताब्यात आहेत. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांच्या विकासकामांचे व्हिजन मांडले आणि केंद्राकडे विशेष मागण्यांचे प्रस्ताव सादर केले.

गेल्या काही वर्षांचा पायंडा मोडला

यंदाची पूर्ण उपस्थिती ही गेल्या काही वर्षांतील पायंडा मोडणारी ठरली आहे. गेल्या वर्षी (१० व्या बैठकीत) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे पिनराई विजयन, कर्नाटकचे सिद्धरामय्या आणि एनडीएचे मित्रपक्ष असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीला दांडी मारली होती. तर २०२४ मध्ये तब्बल १० मुख्यमंत्री अनुपस्थित होते; काही नेत्यांनी बहिष्कार टाकला होता तर काहींनी प्रतिनिधी पाठवले होते. २०२३ मध्येही ९ मुख्यमंत्री बैठकीपासून दूर राहिले होते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारची बैठक ही १०० टक्के उपस्थितीमुळे अत्यंत लक्षवेधी ठरली.

सहकारी संघराज्याची भावना दृढ!

बैठकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सहकारी संघराज्या'च्या महत्त्वावर भर दिला. "सहकारी संघराज्याच्या भावनेने प्रेरित होऊन, आम्ही भारताच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी एकत्र काम करत आहोत. केंद्र आणि राज्यांचे सामूहिक प्रयत्न 'विकसित भारत'चे आमचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील," असे पंतप्रधानांनी 'X' वर लिहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT