Operation Sindoor updates : केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती देण्यासाठी आज (दि. ८मे) सर्वपक्षीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. बैठकीपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीची मागणी केली होती, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले की, "संकटाच्या काळात आम्ही देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर कोणतीही टीका करणार नाही."
सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, " बैठकीत सर्व पक्षांनी परिपक्वता दाखवली. सर्वच पक्षांच्या काही सूचना होत्या, काही संसद सदस्यांनी त्यांच्या चिंता मांडल्या आणि आपण सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन केले."
बैठकीनंतर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. खरगेजींनी सांगितल्याप्रमाणे, सरकारने सांगितलं की काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी चर्चेसाठी खुल्या ठेवलेल्या नाहीत.” दरम्यान, दहशतवादाविरुद्ध सरकारला पूर्ण पाठिंबा आणि लष्कराशी एकता दर्शवत काँग्रेसने 'संविधान वाचवा रॅली'सह पक्षाचे सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित केले आहेत.
सरकारने म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहे. ही कारवाई सुरू आहे, त्यामुळे अचूक संख्या सांगणे कठीण होत आहे. जोपर्यंत पाकिस्तान कोणतीही चिथावणीखोर कारवाई करत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करणार नाही, असेही सरकार स्पष्ट केले आहे.