नवी दिल्ली ः भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर कठोर पावले उचलत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. भारताने सुमारे 9 दहशतवादी तळांवर ब्रह्मोस आणि ‘स्काल्प’ ( SCALP) सारख्या अचूक मिसाईलने म्हणजेच क्षेपणास्त्रांनी हल्ले केल्याचे सांगितले आहे.
या कारवाईत पाकिस्तानने अद्याप तरी 26 दहशतवाद्यांच्या मृत्यूची आणि 38 जणांच्या जखमी होण्याची कबुली दिली आहे; मात्र मृतांची संख्या 90 हून अधिक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यावेळी चीन व तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानने उभ्या केलेल्या डिफेन्स सिस्टीमला ‘स्काल्प’ने बेमालूम चकवा दिला व आपले लक्ष्य गाठण्यात यश मिळवले!
या हल्ल्यांमध्ये भारताने फ्रान्समध्ये विकसित केलेल्या ‘स्काल्प’ क्रूझ मिसाईलचा वापर केला, जी राफेल लढाऊ विमानातून डागली जाते. ‘स्काल्प’ ही एक स्टील्थ मिसाईल असून तिची श्रेणी 500 किमीहून अधिक आहे. या मिसाईलमध्ये रडारला चकमा देण्याची क्षमता आहे, जी यावेळी प्रभावी ठरली आहे. पाकिस्तानच्या चिनी आणि तुर्की मदतीने उभारलेल्या डिफेन्स सिस्टीमसाठी ही मिसाईल ट्रॅक करणे शक्य झाले नाही. यामुळे चीनकडून पुरवले गेलेले HQ-9 आणि LY-80/ HQ-16 डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत.
या हल्ल्यांदरम्यान भारताने अत्यंत काटेकोर आणि अचूक तंत्रज्ञान वापरले. जमिनीच्या अत्यंत जवळून उडणार्या ‘स्काल्प’ मिसाईल्समुळे पाकिस्तानी रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम मिसळल्या. तसेच, भारताने इलेक्ट्रॉनिक डिकॉयचा वापर केला असण्याची शक्यता असून त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांमध्ये गोंधळ निर्माण झाला असावा.
भारताच्या या हल्ल्यांनी केवळ दहशतवादी तळांचा नाश केला नाही, तर पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत केला आहे. चिनी डिफेन्स सिस्टीमच्या अपयशामुळे पाकिस्तानला आता पुढील पावले उचलताना अधिक सावध राहावे लागणार आहे. ही कारवाई केवळ सैनिकीद़ृष्ट्या नव्हे तर सामरिक, तांत्रिक आणि मनोवैज्ञानिकद़ृष्ट्याही प्रभावी ठरली आहे.