Operation Sindoor
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधातील भारतीय सशस्त्र दलांनी राबलेले ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल आणि सैन्याने दाखवलेल्या शौर्य-समर्पणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी कौतुक केले. संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दल प्रमुखांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती राष्ट्रतींना दिली.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवल्याचे सैन्याने राष्ट्रपतींना सांगितले. या भेटीची माहिती राष्ट्रपती भवनाने दिली आहे. संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली, असे राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.