नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लाल किल्ला परिसरातील आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी पाकिस्तान आणि त्यांच्या भूमीवरून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांना कडक संदेश दिला. त्यांनी भारताची नुकतीच झालेली दहशतवादविरोधी मोहीम ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त एक ट्रेलर होता आणि देश भविष्यातील कोणत्याही आव्हानांसाठी पूर्णपणे सज्ज आहे, असे घोषित केले.
एका कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की, भारत दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणार्यांना समान वागणूक देईल. जेव्हा एखादा देश राज्य-पुरस्कृत दहशतवादाला प्रोत्साहन देतो, तेव्हा ती भारतासाठी चिंतेची बाब बनते. भारत प्रगतीबद्दल बोलतो. जर कोणी आमच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल, तर आम्हाला त्यांच्याविरोधात काही कारवाई करावीच लागेल.’
ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा आम्ही न्यू नॉर्मलबद्दल बोलतो, तेव्हा आम्ही स्पष्ट केले आहे की चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. आम्ही फक्त शांततापूर्ण प्रक्रिया अवलंबण्यास सांगत आहोत, ज्याला आम्ही सहकार्य करू. तोपर्यंत, आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या प्रायोजकांना सारखीच वागणूक देऊ. जे दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. आज भारत इतका सक्षम आहे की तो कोणत्याही ब्लॅकमेलच्या प्रयत्नांना घाबरत नाही.
शेजारी देशाने जबाबदारीने वागावे
‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, जो 88 तासांत संपला. आम्ही भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. पाकिस्तानने संधी दिल्यास, शेजारी राष्ट्राशी जबाबदारीने कसे वागावे हे आम्ही त्यांना शिकवू. समन्वयाची आवश्यकता असते. आजच्या काळात युद्धे बहुआयामी असतात. ती किती काळ चालतील हे आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की आमच्याकडे दीर्घकाळ टिकेल इतका पुरवठा आहे.’