नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 129 वा आणि या वर्षातील शेवटचा भाग प्रसारित झाला. दरम्यान, यामध्ये पंतप्रधान मोदींनी 2025 मधील देशाच्या कामगिरीवर आणि 2026 या नवीन वर्षातील आव्हाने, शक्यता आणि विकास यावरही चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांत 2026 या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. दरम्यान, 2025 हे वर्ष सर्वांच्या मनात आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा, असे अनेक क्षण आपण पाहिले. सर्वांना याचा अभिमान वाटला. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, विज्ञान प्रयोगशाळांपासून ते जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठापर्यंत भारताने सर्वत्र एक मजबूत ठसा उमटवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले.
खेळांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, पुरुषांच्या क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. भारताच्या मुलींनी अंध महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. आशिया कप टी-20 मध्येही तिरंगा अभिमानाने फडकला. विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात देशाच्या कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, भारताने विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय बनले. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनाशी संबंधित अनेक उपक्रम 2025 मध्ये सुरू झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेक तरुण मला विचारतात की, ते त्यांचे विचार माझ्यासमोर कसे मांडू शकतात? या उत्सुकतेचे समाधान म्हणजे ‘विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद’ हा कार्यक्रम पुढील महिन्याच्या 12 तारखेला म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनी होणार आहे. मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, असेही ते म्हणाले.