मिशन फत्ते! घरात घुसून हल्ला; 100 दहशतवादी ठार 
राष्ट्रीय

Operation Sindoor : मिशन फत्ते! घरात घुसून हल्ला; 100 दहशतवादी ठार

Indian Army Operation Sindoor : भारताचे ‘ऑपरेशन सिदूर’, पाकमध्ये जाळ आणि धूर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पहलगाममध्ये हिंदू पर्यटक महिलांचे कुंकू पुसणार्‍या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर अकस्मात क्षेपणास्त्र हल्ला चढवला. 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 तळ या हल्ल्याने उखडून फेकले आणि किमान 100 दहशतवादी जागीच ठार केले. यात कंदहार विमान अपहरणात भारताने सोडून दिलेला खतरनाक मौलाना मसूद अझहर याच्या कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. अत्यंत चिरेबंदी नियोजन, अचूक क्षेपणास्त्रांची, त्यावरील स्फोटकांची निवड हे या भारताच्या प्रतिहल्ल्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच पाकिस्तानच्या आत घुसून तीन ठिकाणी आणि पाकव्याप्त काश्मिरातील 6 ठिकाणी एकाच वेळी बरसलेल्या क्षेपणास्त्रांनी लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आणि महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले.

आपली सरहद्द न ओलांडता भारतीय सैन्याने अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हिशेब चुकता केला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजून 5 मिनिटांनी हे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाले आणि 1 वाजून 30 मिनिटांनी भारतीय सैन्याने ‘जय हिंद’चे नारे देत हे ऑपरेशन यशस्वी झाल्याची आनंदवार्ता देशवासीयांना दिली.

15 दिवसांपूर्वी 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगामनजीकच्या बैसरन व्हॅलीत पर्यटकांना धर्म विचारून जवळून गोळ्या घातल्या होत्या. या नृशंस हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर 15 जखमी झाले होते. याच दिवशी सौदी अरबच्या दौर्‍यावर पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने दौरा अर्धवट सोडून भारतात दाखल झाले होते. यानंतर पाकला जन्माची अद्दल घडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या. बिहारमधील जाहीर सभेतून पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कल्पनेपलीकडची शिक्षा देणार, अशी गर्जना केल्यावर पाकची भीतीने गाळण उडाली.

मंगळवारी मध्यरात्री भारताच्या हवाईदलाने राफेल, सुखोई, मिराज या शस्त्रसज्ज अत्याधुनिक विमानांच्या साहाय्याने पाकवर एअर स्ट्राईक केला. मध्यरात्री बहावलपूर, मुरिदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह 9 ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत हल्ले करण्यात आले. भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे कटकारस्थान रचण्यासाठी आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठीच या अड्ड्यांचा उपयोग केला जात होता. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘लष्कर’ आणि ‘जैश’चे मुख्यालयही या हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारतीय हवाईदलाच्या मिराज-2000 आणि सुखोई-30 एमकेआयसारख्या प्रगत लढाऊ विमानांनी बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद भागांना लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. हे भाग बर्‍याच काळापासून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात.

भारतीय लष्कराने अधिकृत निवेदन जारी करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ज्या दहशतवादी तळांवरून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला गेला त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘आमच्या कृती अचूक होत्या. या हल्ल्यांमध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. भारताने लक्ष्य निवड आणि कृती करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. ही कारवाई नुकत्याच पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आली आहे.’

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा व महाविद्यालये बुधवारी (दि. 7) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. यात आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याचे पाक माध्यमांनी सांगितले.

आणखी संभाव्य हल्ले रोखले : परराष्ट्र सचिव

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतावर पुन्हा हल्ले करण्याचे कारस्थान सुरू होते, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. या अड्ड्यांचा अचूक माग काढून एअर स्ट्राईक करून ते भुईसपाट करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान पाकच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही, अशी बुधवारी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या या संयुक्त पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यावेळी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, तीन दशकांपासून पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादी तळ ठोकून बसले आहेत. तेथूनच ते भारतात दहशतवादी कारवाया करतात. आम्ही मध्यरात्री केलेल्या कारवाईत अचूक वेध घेत फक्त दहशतवादी अड्ड्यांनाच लक्ष्य केले. निर्दोष नागरिक व नागरी वस्त्या यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत ही मोहीम राबवण्यात आली.

पंतप्रधानांचे मॉनिटरिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला थेट इशारा दिल्यामुळे भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार, हे निश्चित मानले जात होते. जगभरातील प्रमुख राष्ट्रांनीही भारताच्या भूमिकेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींनीही अनेक उच्चस्तरीय बैठका घेऊन या हल्ल्याचा अतिशय सूक्ष्म आराखडा (मायक्रो प्लॅनिंग) बनवायला सांगितले होते. प्रत्यक्ष हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या 7 जनकल्याण मार्ग या निवासस्थानातून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे त्यांना प्रत्येक क्षणाची माहिती देत होते.

‘भारत माता की जय’ : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाच्या ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर ‘भारत माता की जय’ असे लिहीत भारतीय जवानांचे मनोबल उंचावले.

राफेलवर तैनात ‘स्कॅल्प-इजी’ क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या पोटात भीतीचा गोळा

‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत हवाईदलाच्या राफेल विमानांनी ‘स्कॅल्प-इजी’ क्षेपणास्त्राच्या मदतीने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य केले आहे. ‘स्कॅल्प-इजी’ हे लांब पल्ल्याचे हवेतून सोडले जाणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते फ्रान्स आणि ब्रिटनने संयुक्तपणे विकसित केले होते. भारताने राफेल लढाऊ विमानांसह ही क्षेपणास्त्रे खरेदी केली आहेत. जबरदस्त वेग आणि सपाट आकारामुळे या क्षेपणास्त्राचे रडार क्रॉस सेक्शन खूपच लहान स्वरूपात तयार होते. त्यामुळे शत्रूचे रडार त्यास शोधू शकत नाहीत. त्याचे बाह्य कवचही एका विशेष पदार्थापासून बनलेले असून, ते रडारच्या गोटात गोंधळ उडवून देते. याखेरीज इन्फ्रारेडच्या मदतीनेही शत्रूला त्याचा शोध घेता येत नाही. या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे हे क्षेपणास्त्र लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचेपर्यंत शत्रूला त्याचा जराही सुगावा लागत नाही.

हल्ल्यात काय घडले?

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरचा सियालकोटमधील अड्डा बेचिराख; जैश-ए-मोहम्मद संघटनेचे मुझफ्फराबादमधील अड्डे नेस्तनाबूत; संसदेवरील हल्ल्याचा कट रचला गेला ती सुभान अल्लाह मशीद पाडली; मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात आलातो मरिक्केचा अड्डा नष्ट; जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूरमधील मुख्यालय उद्ध्वस्त; लष्कर-ए-तोयबाचे मुरिदके आणि तंगधारमधील अड्डे उडवले; हिजबूलचा सियालकोटमधील प्रशिक्षण अड्डा नेस्तनाबूत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT