पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील बुधवारी पहाटे नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनंतर अनेक विमान कंपन्या सतर्क झाल्या आहेत. स्पाइसजेट (SpiceJet) , इंडिगो (IndiGo) आणि एअर इंडियाने (Air India) पुढील सूचना मिळेपर्यंत विविध शहरांमधील त्यांच्या विमान सेवा स्थगित केल्या आहेत. तसेच, प्रवाशांसाठी विमान प्रवासासंबंधी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
स्पाइसजेटने (SpiceJet) सांगितले आहे की, धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागातील विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. हल्ल्यादरम्यान प्रस्थान, आगमन आणि परिणामी उड्डाणांवरही परिणाम होईल, असे एअरलाइनने (Airline) म्हटले आहे. विमान कंपन्यांनी सरकारची एडवाइजरी जारी लक्षात घेऊन प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली. प्रवास करण्यापूर्वी तुमच्या फ्लाइटची स्थिती देखील तपासा, असेही विमान कंपन्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने देशातील निवडक शहरांमधून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांसाठी एक सल्लागार जारी केला आहे. इंडिगोने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि धर्मशाळा येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होईल. याशिवाय, सध्याच्या हवाई निर्बंधांमुळे बिकानेरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवरही परिणाम होईल. विमान कंपनीने प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची विनंती केली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारताने बुधवारी (दि.७) पहाटे अचूक क्षेपणास्त्र हल्ला करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराने या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यांना दुजोरा दिला.