Operation Sindoor Indian Armed Forces Common Press Conference
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाईदलाने मोठी कामगिरी पार पाडली. पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात प्रमुख दहशतवाद्यांचाही समावेश होता.
पाकिस्तानातील विविध 11 हवाई तळांवरही हल्ले केले. दरम्यान, लष्कराच्या वतीने झालेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत पाकिस्तानचे अणुस्थळ असलेल्या किराणा हिल्सवर भारताने हल्ला केला आहे का? असा सवाल केला गेला. त्यावर एअर मार्शल ए. के. भारती यांनी उत्तर दिले आहे.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत हवाई संचालन महासंचालक, एअर मार्शल ए. के. भारती यांनी स्पष्ट केले की, “किराणा हिल्समध्ये अणुस्थळ असल्याची माहिती तुम्ही दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आम्हाला याबाबत माहिती नव्हती. आम्ही किराणा हिल्सला लक्ष्य केलेले नाही, तिथे जे काही आहे, ते आमच्या टारगेटमध्ये नव्हते.
भारतीय हवाई दलाच्या जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्तानने गोळीबार आणि ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावरही भारतीय सुरक्षा दलांनी कठोर कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरसह पश्चिम व उत्तर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांवर मोठे नुकसान झाले आहे.
अलीकडेच उपग्रह चित्रांद्वारे पाकिस्तानमधील सरगोधा येथील मुशाफ एअरबेसवर हल्ला झाल्याचे संकेत मिळाले होते. ही एअरबेस किराणा हिल्सखालील भूमिगत अणुशस्त्र साठ्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणी अनेक 'लोइटरिंग म्युनिशन्स' म्हणजेच सुस्पष्ट लक्ष्य शोधणाऱ्या हल्ल्यांद्वारे आक्रमण झाल्याचे वृत्त होते.
रविवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांनी पाकिस्तानमधील विविध ठिकाणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर झालेल्या नुकसानीचे दृक्श्राव्य पुरावे सादर केले.
भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पाकिस्तानमधील 11 हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये पसरूर, चूनियां आणि अरिफवाला येथील एअर डिफेन्स रडार यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.