अटारी बॉर्डर परिसर निर्मनुष्य 
राष्ट्रीय

Operation Sindoor| अटारी बॉर्डर परिसर निर्मनुष्य

सीमेवर तणाव कायम; कारगिल युद्धाची आठवण ताजी; अमृतसरमध्ये रेड अलर्ट

पुढारी वृत्तसेवा
किरण ताजणे

अटारी बॉर्डर, अमृतसर ( भारत-पाक सीमा ) : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डर परिसर निर्मनुष्य झाला आहे. पर्यटकांची वर्दळ असलेला या परिसरात भारतीय लष्कराचाच वावर आहे. बीएसएफ तुकडीसह लष्कराचे जवान तैनात आहेत. पर्यटक नसल्याने हॉटेल्स, दुकाने बंद आहेत. कारगिल युद्ध, त्यानंतर पुलवामा हल्लानंतर अशी स्थिती निर्माण झाल्याचं अटारी बॉर्डर परिसरातील स्थानिकांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितले. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून पाकिस्तानमधील दहशतवादी आड्डे उद्भवस्थ करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून आगळीक सुरू झाली. त्यास भारताकडून प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे तणाव कायम आहे.

पाकिस्तानपासून अगदी जवळ असलेल्या अमृतसरवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र भारताच्या हवाई दलाने ड्रोन हल्ला निष्क्रिय केला असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अमृतसर येथील हवाई अड्डा आणि खासे कॅन्ट यांना पाकिस्तानकडून लक्ष्य केले गेले, अमृतसरला लागून असलेल्या सांबा परिसरात लाहोरच्या हवाई अड्ड्यावरून पाकिस्तानने हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र भारतीय सैन्याने त्यास निष्क्रिय करत पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला होता. भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर या भागातील शेतकर्‍यांवर परिणाम झाल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. परिसरात असलेल्या शेतीमध्ये शेतकर्‍यांना लष्कराच्या सूचनेनुसार प्रतिबंध आहे. मात्र, भारत हद्दीत असलेल्या शेतकर्‍यांनी शेतात असलेला गहू बहुतांश प्रमाणात काढून घेतला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील गावंच खाली झाली आहेत. पाकिस्तानच्या हद्दीतील शेतीत असलेली पिके न काढताच पाकिस्तानी नागरिकांनी गाव सोडल्याची माहिती सीमेवरील स्थानिकांनी दिली आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी अटारी बॉर्डर परिसरात आत्ताच्या घडीला जसा तणाव आहे, तसाच तणाव होता, पुलवामा हल्ल्यानंतरही दहा दिवस तणाव होता. पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांची संख्या एकदमच घटल्याने पर्यटन नगरीत शुकशुकाट निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या वर्दळीपलीकडे बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. पर्यटक नसल्यानं हॉटेल्सच्या बुकिंग नाहीत, त्यामुळे हॉटल्स ओस पडली आहेत.

ब्लॅक आऊट अन रात्रीची गस्त

अमृतसर शहरात रेड अलर्ट असल्याने अत्यावश्यक सेवा सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून तणावाची परिस्थिती असल्यानं लष्कराच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून ब्लॅक आऊट केला जात आहे. पंजाब पोलिसांकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात असून अत्यावश्यक कारणं वगळता घराबाहेर न पडण्याचे आवाहन अमृतसर वासीयांना करण्यात आले आहे. याशिवाय कुठल्याही अफवांवर विश्वास ठवू नका, प्रशासनाने दिलेल्या सूचनांवर विश्वास ठेवावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT