Jammu and Kashmir Kulgam Encounter
जम्मू- काश्मीरच्या कुलगाममधील अखल येथील जंगलात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी चकमक सुरु आहे. आतापर्यंत एका दहशतवाद्याच्या खात्मा करण्यात आला आहे. अखल जंगल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय सैन्यदल, जम्मू- काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) यांच्या संयुक्त पथकाने १ ऑगस्ट रोजी हे ऑपरेशन सुरु केले होते. या ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु आहे.
गुप्तचर माहितीनुसार, येथील जंगलात ४ ते ५ दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. दरम्यान, घनदाट जंगले आणि डोंगराळ भागामुळे त्यांचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहे. दरम्यान, या कारवाईत ६ लष्करी जवान जखमी झाले आहेत. गेल्या शुक्रवारी ३ जवान, रविवारी १ आणि सोमवारी २ जवान जखमी झाले. जखमी जवानांना तत्काळ लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात शनिवारी रात्रभर झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
याधी ३० जुलै रोजी पूंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने केलेल्या कारवाईत नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना मारण्यात आले होते. ऑपरेशन शिवशक्ती...भारतीय सुरक्षा जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले, असे व्हाईट नाईट कॉर्प्सने म्हटले होते.