पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी आज गुरुवारी (दि.३१) केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या १४९व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस (Rashtriya Ekta Diwas) साजरा केला जातो. त्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी बोलताना पीएम मोदी यांनी सर्व देशवासियांना 'राष्ट्रीय एकता दिना'च्या शुभेच्छा दिल्या.
"यावेळी राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे. आज एकीकडे आपण एकात्मतेचा उत्सव साजरा करत आहोत, तर दुसरीकडे दिवाळीचा सण आहे," असे पीएम मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी पीएम मोदी यांनी बोलताना पुनरुच्चार केला की, आम्ही 'वन नेशन, वन इलेक्शन'वर (One Nation One Election) काम करत आहोत. याला लवकरच मंजुरी दिली जाईल आणि ते प्रत्यक्षात आणले जाईल. या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल. तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. तसेच भारत आता समान नागरी कायद्याच्या (Uniform Civil Code) या दिशेने वाटचाल करत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राष्ट्रीय एकता दिवस' प्रसंगी बोलताना सांगितले.
''आम्ही कलम ३७० कायमचे हटवले. या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तिथे कोणत्याही भेदभावाशिवाय मतदान झाले. तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली. हे दृश्य भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना खूप आनंद देणारे असेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल आणि हीच आमची राज्यघटना शिल्पकारांना विनम्र श्रद्धांजली.'' असे पीएम मोदी म्हणाले.