जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला यांनी आज शपथ घेतली.  (Image source- DD News)
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला यांनी घेतली शपथ, काँग्रेस सरकारमधून बाहेर

Omar Abdullah Oath Ceremony : काँग्रेसचा सरकारमध्ये सहभाग नाही

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) मुख्यमंत्रीपदी आज बुधवारी (दि. १६) ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Oath Ceremony) यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते.

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) पक्षाला यश मिळाले. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर ओमर अब्दुल्ला हे जम्मू- काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. आज शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.

उपमुख्यमंत्रीपदी सुरिंदर कुमार चौधरी

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरिंदर कुमार चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सकिना इटू, जावेद अहमद राणा, जावेद अहमद दार आणि अपक्ष आमदार सतीश शर्मा यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली.

काँग्रेसचा सरकारमध्ये सहभाग नाही, बाहेरून पाठिंबा

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने मिळून ही निवडणूक लढवली होती. पण काँग्रेस नवीन जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. काँग्रेसने नवीन सरकारमध्ये एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे.

सरकारमध्ये सहभागी न होण्याचे काँग्रेसने सांगितले कारण

जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे (JKPCC) प्रमुख तारिक हमीद कारा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आज सांगितले की, काँग्रेस पक्ष सध्यातरी जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभाग होणार नाही. काँग्रेसने केंद्र सरकारकडे जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय पंतप्रधानांनी जाहीर सभांमध्ये तसे आश्वासनही दिले आहे. पण जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात आलेला नाही. यामुळे आम्ही नाराज असून आम्ही सध्यातरी सरकारमध्ये सामील होणार नाही. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी नेहमी लढत राहील, असे तारिक हमीद कारा यांनी म्हटले आहे.

शपथविधी सोहळ्याआधी श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना, ओमर अब्दुल्ला म्हणाले, "आम्हाला खूप काही करायचे आहे." त्यांचे सरकार जम्मू- काश्मीरमधील लोकांच्या तक्रारी जाणून घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

'हे जनतेचे सरकार आहे'

"आम्ही लोकांना विश्वास दिला पाहिजे की हे त्यांचे सरकार आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेईल. गेल्या ५-६ वर्षांपासून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात नव्हत्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करणे ही आमची जबाबदारी असेल," अशीही ग्वाही त्यांनी दिली.

आपचा एक आणि पाच अपक्षांचा पाठिंबा

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, नॅशनल कॉन्फरन्सने (NC) ९० पैकी ४२ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. आम आदमी पक्षाच्या (AAP) तिकीटावर निवडून आलेल्या एका आमदाराने आणि पाच अपक्षांनी ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे.

ओमर अब्दुल्ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

नॅशनल कॉन्फरन्स (NC) विधिमंडळ पक्षाने गुरुवारी एकमताने ओमर अब्दुल्ला यांची पक्षनेतेपदी निवड केली होती. आता ते मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. त्यांनी २००९ ते २०१४ दरम्यान एनसी-काँग्रेस युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी जम्मू- काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT