श्रीनगर : वृत्तसंस्था
श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये बुधवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या केंद्रशासित प्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री बनले.
शपथविधी सोहळा उत्साहात, सुरेंद्र चौधरी उपमुखमंत्रिपदी
राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांची उपस्थिती
काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन धक्का दिला आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.नौशेराचे आमदार सुरेंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चौधरी यांनी भाजपचे जम्मू-काश्मीर अध्यक्ष रवींदर रैना यांचा पराभव केला होता.सकीना इट्टू, जावेद राणा, जावेद अहमद दार, सतीश शर्मा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शर्मा हे अपक्ष असून, त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआयचे डी. राजा, सीपीआयएमचे प्रकाश करात , आदी यावेळी उपस्थित होते.