Omar Abdullah Gen Z viral video  Pudhari
राष्ट्रीय

Omar Abdullah : "माझा बाप कोण आहे..."ची ही नवी आवृत्ती; 'आम्ही Gen Z आहोत' व्‍हायरल व्हिडिओवर CM ओमर अब्दुल्ला भडकले!

कारगिलमधील पर्यटक तरुणीच्‍या व्हायरल व्हिडिओचा कडक शब्‍दांमध्‍ये घेतला समाचार

पुढारी वृत्तसेवा

Omar Abdullah Gen Z viral video : कारगिलमधील तपासणी नाक्यावर एका पर्यटक तरुणीने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, 'आम्ही Gen Z (जेन झी) आहोत' हा शब्द आता 'माझा बाप कोण आहे माहितीय का?' या जुन्याच अरेरावीच्या भाषेची नवी आवृत्ती बनत चालल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

'आम्ही Gen Z आहोत' ... व्‍हिडिओ तुफान व्‍हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कारगिलमधील मिनीमार्ग तपासणी नाक्यावर एक तरुणी पर्यटक वाहतूक बंदीवरून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. "आम्ही Gen Z आहोत आणि आम्ही हा मूर्खपणा अजिबात सहन करणार नाही," असे सांगत तिने प्रशासनाच्या कारवाईवर सवाल उपस्थित केला. "कश्मीरी लोकांसोबत तर तुम्ही हे करतच होतात, आता पर्यटकांसोबतही करू लागलात," असा गंभीर आरोपही तिने या व्हिडिओत केला आहे.

'माझा बाप कोण आहे माहितीय का?'ची नवी आवृत्ती : अब्दुल्लांनी सुनावले

या व्हिडिओवर भाष्य करताना ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्‍स' केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, "ही 'आम्ही Gen Z आहोत' ची भाषा आता 'माझा बाप कोण आहे माहितीय का?' या जुन्याच उद्दामपणाची नवी आवृत्ती बनली आहे. स्वतःच्या गैरसोयीचा आकांडतांडव करत या शब्दाचा वापर थेट धमकीसारखा करणे म्हणजे स्वतःची उरलीसुरली प्रतिष्ठा गमावण्याचा सर्वात वेगवान मार्ग आहे."

25 जुलै रोजी वाहतूक का रोखली होती?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जुलै रोजी घडली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ हे झोजिला-गुमरी मार्गाने कारगिलकडे जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक रोखण्यात आली होती. दोन्ही व्हीआयपी सुरुवातीला विमानाने प्रवास करणार होते, परंतु खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरने गुमरी येथे उतरावे लागले आणि तेथून कारगिलकडे रस्ता मार्गाने जावे लागले. २६ जुलै रोजी होणाऱ्या 'कारगिल विजय दिना'च्या पूर्वसंध्येला सुरक्षेचा उपाय म्हणून ही वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती, ज्यामुळे पर्यटकांना काही वेळ वाट पहावी लागली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT