Age gap relationships psychology AI Photo
राष्ट्रीय

Relationships: वयस्कर पुरुष आपल्यापेक्षा खूपच तरुण स्त्रियांच्या मागे का लागतात?

Age gap relationships psychology: वयस्कर पुरुषांना खूपच तरुण महिलांचे आकर्षण का असतं? शतकानुशतके विज्ञान, मानसशास्त्र आणि पुराणकथा या विषयाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे.

मोहन कारंडे

Relationships

नवी दिल्ली: बंगळूरूतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वर्गात लेक्चर सुरू असताना एका ज्येष्ठ प्राध्यापकाने माईक हातात घेतला आणि चक्क आपल्याच विद्यार्थिनीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. त्या संतप्त विद्यार्थिनीने त्याला चपलेने मारले. ही एक वेगळी घटना वाटू शकेत पण खरं तर ही एक खूप जुनीच गोष्ट आहे. वयस्कर पुरुष आणि त्यांच खूपच तरुण महिलांकडे असलेलं आकर्षण; शतकानुशतके विज्ञान, मानसशास्त्र आणि पुराणकथा या विषयाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे.

सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत... एकच पॅटर्न

हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ ५० वर्षांचा आहे, पण त्याने २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना क्वचितच डेट केलं आहे. टोबी मॅग्वायर असो वा कान्ये वेस्ट, या सर्वांच्या जोडीदारांमध्ये किमान १५ ते २० वर्षांचे अंतर; भारतात मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांच्यातील २६ वर्षांच्या अंतराची चर्चा आजही होत असते. बंगळुरूच्या त्या प्राध्यापकाकडे खासगी विमान किंवा फॅशन लेबल नसले, तरी त्याची मानसिकता या सेलिब्रिटींपेक्षा वेगळी नसून एकच पॅटर्न!

पुराणकथा आणि मानसशास्त्र काय सांगतं?

'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, पुराणकथांमध्येही या प्रवृत्तीबाबत ऐकायला मिळते. झ्यूस हा ग्रीक देवांचा राजा होता. त्याचे लग्न 'हेरा'शी झाले होते; परंतु तो नेहमी तरुण स्त्रियांच्या प्रेमात पडायचा. त्याने या गोष्टीला एक धार्मिक अधिष्ठानच प्राप्त करून दिले होते.

रोमन कवी ओव्हिड याने 'मेटामॉर्फोसिस' या पुस्तकात पिग्मॅलियन नावाच्या एका शिल्पकाराची कथा लिहिली आहे. पिग्मॅलियन हा शिल्पकार हस्तिदंतातून आपल्या स्वप्नातील स्त्रीची मूर्ती तयार करतो आणि तिच्याच प्रेमात पडतो. नंतर तो एका देवीकडून तिला जिवंत करवून घेतो. मानसशास्त्रात यालाच 'पिग्मॅलियन इफेक्ट' म्हटले जाते, जिथे पुरुष प्रेमाला शोधत नाही तर त्याला आपल्या कल्पनेतील आदर्श स्त्री हवी असते.

हरवलेले तारुण्य शोधण्याची धडपड... विज्ञान काय सांगतं?

जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट ट्रिव्हर्स आणि मानसशास्त्रज्ञ डेव्हिड बस यांच्या संशोधनानुसार, जगभरातील ३७ संस्कृतींमध्ये एक साम्य आढळते, पुरुषांना नेहमीच तरुण स्त्रिया हव्या असतात, तर स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या वयाने मोठ्या पुरुषांना प्राधान्य देतात. पुरुषांसाठी तारुण्य हे प्रजननाचे आणि ऊर्जेचे प्रतीक असते, तर स्त्रियांसाठी अनुभव आणि स्थैर्य महत्त्वाचे असते. ख्रिश्चन रडर यांच्या डेटानुसार २२, ३५, ५० अशा सर्व वयोगटातील पुरुषांना २० ते २३ वयोगटातील महिला सर्वात आकर्षक वाटतात. महिलांची पसंती त्यांच्या वयानुसार बदलते पण पुरुषांची बदलली नाही.

खरी अडचण कुठे आहे?

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांच्या मते, प्रत्येक पुरुषाच्या मनात एक स्त्रीची प्रतिमा असते. वयाच्या ४०-४५ व्या वर्षी जेव्हा पुरुषांना आपल्या मृत्यूची किंवा वाढत्या वयाची जाणीव होऊ लागते, तेव्हा ते स्वतःचे तारुण्य सिद्ध करण्यासाठी तरुण जोडीदाराचा शोध घेतात. तरुण जोडीदार ही त्यांच्यासाठी केवळ व्यक्ती नसून, ती स्वतःच्या अस्तित्वाचे आणि 'हिरो' असण्याचे प्रतिबिंब असते.

काय सांगते आकडेवारी?

२०१८ मधील 'सोशल सायन्स अँड मेडिसिन'च्या अभ्यासानुसार, वयातील मोठे अंतर असलेल्या संबंधांमध्ये पुरुषांचे समाधान जास्त असते, मात्र स्त्रियांचे समाधान काळानुसार कमी होत जाते. अशा जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाणही समवयस्क जोडप्यांच्या तुलनेत जास्त असते.

आता ट्रेंड बदलतोय का?

'द इकॉनॉमिस्ट'च्या आकडेवारीनुसार, सध्या ट्रेंड बदलत आहे जशा स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत, तशा त्या आपल्या वयाच्या जोडीदाराची निवड करत आहेत. बंगळुरूच्या त्या घटनेत, विद्यार्थिनीने आणि तिच्या मित्रांनी दिलेली प्रतिक्रिया ही बदलत्या काळाची पावती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT