किशोरी पेडणेकर यांचा मंत्र्यावर आरोपी Pudhari Photo
राष्ट्रीय

अधिकाऱ्यांना सरकारमधील मंत्री तासनतास ताटकळत बसवून ठेवतात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत अंधेरी भागात एक महिलेचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला, ही अत्यंत वाईट आणि क्लेशदायक घटना आहे, ज्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. त्या अधिकाऱ्यांना सरकारमधील मंत्री तासनतास ताटकळत बसवून ठेवतात. त्यामुळे त्यांना आपल्या कामाला वेळ देता येत नाही, असा गंभीर आरोप मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. तसेच मृत महिला त्या कुटुंबातील एकटीच कमावती होती. त्यामुळे तिच्या कुटूंबाचा आधारवड हरपला आहे, असेही त्या म्हणाल्या. पेडणेकर एका कार्यक्रमासाठी दिल्ली दौऱ्यावर होत्या, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापालिकेने पावसाळी जाळ्या नीट तपासल्या पाहिजेत. पावसाळी जाळ्या बसवण्याचा प्रस्ताव आम्ही २०१५ मध्ये दिला होता. त्यानंतर त्या जाळ्या बसवल्याही होत्या, मात्र गेले काही वर्ष महापालिकेत प्रशासक आहेत. त्यामुळे पावसाळी जाळ्यांची देखरेख नीट झाली की नाही हे तपासले पाहिजे, असेही पेडणेकर म्हणाल्या. विधानसभेच्या जागा वाटपाबद्दल बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये सर्व प्रमुख पक्ष ताकदीचे आहेत, सर्व पक्षांकडे उमेदवार आहेत. जागा वाटपात कुठलाही वाद नाही. मात्र ज्या जागा आम्ही यापूर्वी लढल्या होत्या त्या पुन्हा लढवाव्या, ही आमची मागणी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य पक्षांचे प्रमुख नेते चर्चेतून यावर तोडगा काढतील आणि जागावाटप ठरवतील, असेही पेडणेकर म्हणाल्या. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री व्हावेत असे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही आई जगदंबेकडे आमची प्रार्थना आहे, असेही त्या म्हणाल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT