ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आक्षेपार्ह प्रकार कैद
सीसीटीव्ही फुटेज कोणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर लीक केले.
'एनसीआरटीसी'कडून पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिलेली नाही
Namo Bharat Train Viral Video
गाझियाबाद : एका प्रेमीयुगुलाने 'नमो भारत' चालत्या ट्रेनमध्येच अश्लील कृत्य केल्याचा एका संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील लज्जास्पद कृत्यांमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा प्रकार आरआरटीएस (RRTS) नेटवर्कच्या गाझियाबाद-मेरठ विभागादरम्यान घडली आहे.
ट्रेन मोदीनगर (उत्तर) स्टेशनच्या दिशेने जात असताना हा लज्जास्पद प्रकार २४ नोव्हेंबर रोजी घडला. एका तरुण आणि तरुणीने डब्यातच आक्षेपार्ह कृत्य केले. ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा आक्षेपार्ह प्रकार कैद झाला. हे फुटेज कोणीतरी आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर लीक केले.
या प्रकरणावर एनसीआरटीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "हा व्हिडिओ मागील महिन्यातील आहे. याप्रकरणी अंतर्गत तपास सुरू करण्यात आला असून काही ठोस पावलेही उचलली गेली आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण-तरुणी हे आमचे कर्मचारी नसून प्रवासी आहेत. प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही लवकरच विशेष मोहीम राबवणार आहोत."
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गाझियाबाद पोलिसांनी स्पष्ट केले की, "या संदर्भात अद्याप एनसीआरटीसीकडून कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारींना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत."