Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: ६३ कॉल्स, ४७ मेसेज अन् रात्रभर सॉरी म्हणत होती; अखेर सकाळी नर्स पत्नीचा मृत्यू

एका खासगी रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये २८ वर्षीय नर्सचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मोहन कारंडे

Crime News:

बरेली: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये २८ वर्षीय नर्सचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियंका असे मृत नर्सचे नाव आहे. मृत्यूच्या आधी प्रियंका रात्रभर पतीला फोन आणि मेसेज करून विनवणी करत होती, मात्र पतीने एकही कॉल उचलला नाही. रविवारी दुपारी प्रियंकाचा मृतदेह आढळला.

नेमकं काय घडलं?

पीलीभीत येथील रहिवासी सुनील आणि प्रियंका यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. दोघेही व्यवसायाने परिचारक आहेत. मात्र, कौटुंबिक वादामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रियंका पतीपासून वेगळी राहत होती. ती रुग्णालयाजवळील एका हॉस्टेलमध्ये आपल्या सहकाऱ्यासोबत वास्तव्यास होती. शनिवारी प्रियंकाची रात्रपाळी होती, पण प्रकृती ठीक नसल्याने तिने रजा घेतली होती. रविवारी दुपारी जेव्हा तिची रूममेट ड्युटीवरून परतली, तेव्हा प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मोबाईलमधील रेकॉर्ड्स पाहून पोलीसही चक्रावले

बारादरी पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने प्रियंकाच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. प्रियंकाने शनिवारी रात्रभर पती सुनीलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तिने रात्रीतून तब्बल ६३ व्हॉट्सॲप कॉल्स, ४७ मेसेजेस आणि १ व्हॉइस नोट पाठवली होती. या सर्व मेसेजमध्ये प्रियंका पतीला 'सॉरी' म्हणत होती आणि स्वतःची चूक सुधारण्यासाठी त्याला मनवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. दुर्दैवाने, सुनीलने एकाही कॉलला प्रतिसाद दिला नाही.

संशय आणि वादातून संसाराचा अंत

या घटनेनंतर पोलिसांनी पती सुनील याला ताब्यात घेतले आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याचा पत्नीवर संशय होता. यातून दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. याच कारणामुळे ते वेगळे राहत होते. प्रियंकाने अलीकडेच एक बुटीक सुरू केले होते आणि ती आर्थिक अडचणीतही होती. दुसरीकडे, प्रियंकाच्या माहेरच्यांनी सुनीलवर छळाचे आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT