पुढारी ऑनलाईन डेस्क : Dr. Rajagopal Chidambaram Passes Away | देशातील ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. पोखरण १ (१९७५) आणि पोखरण २ (१९९८) च्या अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चिदंबरम यांनी मुंबईतील जसलोक रुग्णालयात पहाटे ३.२० वाजता अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीत त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (DAE) सचिव म्हणून काम केले. ते १९९४-९५ दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष होते. डॉ. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही होते. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या दोन्ही पोखरण अणुचाचण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना अनुक्रमे १९७५ आणि १९९९ मध्ये पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.