नवी दिल्ली : देशभरातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने समोर येणाऱ्या त्रुटी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कडक पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) आपल्या सर्व परीक्षा प्रक्रियेचे सखोल ऑडिट करण्याचे आणि त्रुटींवर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. त्यामुळे जेईई मेन्स, नीट यूजीसह एनटीएकडून घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षा प्रक्रियेचे ऑडिट होणार असल्याचे निश्चित झाले.
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्चशिक्षण सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत या वर्षात पार पडलेल्या परीक्षांमधील गैरप्रकार, तांत्रिक बिघाड आणि गोपनीयतेचा भंग या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, प्रस्थापित परीक्षा नियमावलीचे १०० टक्के पालन सुनिश्चित केले पाहिजे.
‘कॉनऑप्स’ प्रणाली
एनटीएच्या गोपनीय ऑपरेशन्स आर्किटेक्चरमध्ये पूर्ण सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रश्नपत्रिकांची छपाई आणि साठवणुकीसाठी सुरक्षित स्वतंत्र खोल्या, इंटरनेटशी न जोडलेली ‘एअर गॅप’ संगणक प्रणाली आणि परीक्षा केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्याची नियमावली राबवण्यास सांगितले आहे.
५० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
एनटीएच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, परीक्षांमधील त्रुटी आणि पेपर लीक प्रकरणात सामील असल्याच्या संशयावरून ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
नवीन टीम लिडरची भरती
यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एनटीएमध्ये १० नवीन उच्चस्तरीय टीम लिडरची जाहिरात देण्यात आली आहे. सायबर सुरक्षा, प्रश्नपत्रिका डिझाईनसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
वर्षभरातील वादग्रस्त परीक्षा आणि पुनर्परीक्षांचे सत्र
यावर्षी एनटीएने घेतलेल्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. यूजीसी-नेट परीक्षा : प्रश्नपत्रिकेत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्यामुळे इंग्रजी, समाजशास्त्र आणि वाणिज्य या तीन विषयांची पुनर्परीक्षा घेण्याची घोषणा एनटीएने नुकतीच केली आहे. नीट-यूजी : ३ मे रोजीचा पेपर लीक झाल्याच्या तक्रारींमुळे परीक्षा रद्द करून ती २१ जून रोजी पुन्हा घेण्यात आली. सीयूईटी-यूजी : ३० मे रोजी झालेल्या परीक्षेत सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे तब्बल ३,७६५ विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती, ज्यामुळे देशभरात तीव्र नाराजी पसरली होती.
ऑडिट कसे होणार?
परीक्षांमधील सततच्या त्रुटींनंतर शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेचे संपूर्ण ऑडिट करण्याचे आदेश दिले.
सायबर सुरक्षा, पेपर डिझाईन आणि गोपनीय ऑपरेशन्ससाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
यूजीसी-नेट, नीट आणि सीयूईटी परीक्षांमधील गैरप्रकारांनंतर परीक्षा यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.