नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई - मुख्य) स्वरूपात राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएने राष्ट्रीय-स्तरीय प्रवेश परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. एनटीएने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, विभाग ब ( सेक्शन-बी) मधील पर्यायी प्रश्नाचे स्वरूप बंद केले जाणार आहे. या बदलाचा अर्थ म्हणजे विभाग ब मधील पाच पैकी पाच प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. या पाच प्रश्नांना पर्याय म्हणून अधिकचे प्रश्न उपलब्ध नसतील. एनटीएने म्हटले आहे की, २०२१ मध्ये कोरोना साथीच्या काळात विभाग ब मध्ये विद्यार्थ्यांना दहा पैकी पाच प्रश्न सोडवण्याची मुभा देण्यात आली होती. कोरोना काळात विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताणतणाव कमी करण्यासाठी हा बदल २०२१ मध्ये करण्यात आला होता. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना साथ संपल्याचे जाहीर केल्यामुळे विभाग ब मधील प्रश्नांचे स्वरूप पहिल्यासारखे करण्यात आले असल्याचे एनटीएने परिपत्रकात सांगितले.
२०२१ च्या अगोदरही जेईई मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विभाग बी मधील पाच पैकी पाच प्रश्न सोडवणे अनिवार्य असायचे. जेईई मुख्य परीक्षा २०२५ पासून, विभाग ब मध्ये प्रत्येक विषयासाठी फक्त पाच संख्यात्मक प्रश्न असतील. अशा प्रकारे, या सर्व प्रश्नांची उत्तरे अनिवार्यपणे दिली पाहिजेत. परीक्षेच्या स्वरूपातील बदलांसोबतच आणखी एक उल्लेखनीय घोषणा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली. त्यात म्हटले आहे की जेईई मुख्य २०२५ च्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि त्याचे तपशील राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
३०० गुणांच्या जेईई मुख्य परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे तीन विभाग असतात. यात प्रत्येक विभागात ३० असे एकूण ९० प्रश्न असतात. तीन तास चालणाऱ्या परीक्षेच्या विभाग ए मध्ये प्रति विषय २० बहु-निवडक प्रश्न असतात. सुधारित परीक्षा पद्धतीचा विचार करता, विभाग ब मध्ये आता पाच अनिवार्य प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण (निगेटिव्ह मार्किंग) पद्धती असते.